शिकाऊ उमेदवारांच्या स्टायपेंडचा भार प्रवासी उत्पन्नावर
By राजेश शेगोकार | Published: May 2, 2023 06:57 PM2023-05-02T18:57:28+5:302023-05-02T18:57:41+5:30
एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते.
अकाेला : एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते. या उमेदवारांना एसटी महामंडळाकडून विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जाते. याकरिता महामंडळ आपल्या प्रवासी उत्पन्नातील निधी खर्च करून नंतर या निधीसाठी केंद्र शासनाकडे मागणी दाखल करते. एस.टी.च्या अकाेला विभागात मात्र गेल्या मार्च २०२० पासून अशा प्रकारच्या निधीची मागणीच नाेंदविली गेली नसल्याने शिकाऊ उमेदवारांच्या स्टायपेंडचा भार प्रवासी उत्पन्नावर पडला असल्याचे समाेर आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागांमध्ये दरवर्षी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते. या उमेदवारांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाेशन याेजने अंतर्गत विद्यावेतन दिले जाते. केंद्र शासनाकडून निधी मिळण्याची वाट न पाहता या उमेदवारांना महामंडळ आपल्या प्रवासी उत्पन्नातून विद्यावेतन अदा करत. असे दरमहा अदा केलेल्या विद्यावेतनाचे सविस्तर विवरणपत्र तयार करून केंद्र शासनाकडे याचा परतावा मागितला जाताे. अकाेला विभागामध्ये मार्च २०२० ते एप्रिल २०२३ पर्यंत अशा प्रकारे कुठलाही परतावा मागितला गेलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्यामुळे प्रवासी उत्पन्नातील १ काेटी ४७ लाख १४ हजार ६६७ रुपयांचा खर्च विद्यावेतनावर झाला आहे.