विद्यार्थ्यांंच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!
By admin | Published: December 2, 2015 02:43 AM2015-12-02T02:43:18+5:302015-12-02T02:43:18+5:30
ओझे कमी करण्याची मुदत संपली : दोन संच देण्यास पुस्तकांचाही तुटवडा
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, हे ओझे कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंंतची मुदत देण्यातआली होती. त्यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना दोन पुस्तक संच देण्याचा उपक्रम राबविण्यात आला; मात्र पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याने मुदत संपूनही विद्यार्थ्यांंवर दप्तरांचे ओझे कायम दिसून येत आहे.
राज्यात ५२ हजार ९९१ प्राथमिक व २८ हजार १४५ उच्च प्राथमिक शाळा आहेत. मुलांचे दप्तर उघडले की, त्यात पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, सहा मुख्य विषयांची पुस्तके, खासगी प्रकाशकांच्या वर्कबुक्स, सर्व विषयांच्या वर्गपाठ-गृहपाठाच्या २00-२00 पानी वह्या, निबंधाच्या वह्या, कंपासपेटी, निरनिराळ्या रंगपेट्या व इतर खेळण्याचे साहित्य घेऊन मुलं शाळेत येतात. याशिवाय शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव असल्यास त्याचे वेगवेगळे पोशाख आणि साहित्यही आणावे लागते. शाळा सुटल्यावर लगेच वर्ग भरत असल्यास त्याच्या वह्या सोबत असतात. उपयुक्तता न तपासता हे ओझे विद्यार्थ्यांंना वाहावे लागते. विद्यार्थ्यांंंच्या बौद्धीक वाढीबरोबरच निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांंना तणावमुक्त करून आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंंतच्या विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय २१ जुलै रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ३0 नोव्हेंबरपर्यंंंत राज्यभरातील शाळांना करावी लागणार होती. त्यानुसार राज्यातील काही शाळांनी शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (एक विद्यार्थ्याच्या घरी आणि दुसरा शाळेत) करावेत; असा उपक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थ्यांंंना पुस्तकाचे दोन संच आवश्यक आहेत. मात्र, पुस्तकांचा तुटवडा असल्याने राज्यातील काहीच शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबाजावणी होऊ शकली आहे. दरम्यान दप्तराचे ओझे कमी करण्याची मुदत संपुणही राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कायम असल्याचे दिसून येत आहे.