जुने शहरात एक लाखाची घरफोडी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:01 PM2018-08-10T13:01:16+5:302018-08-10T13:02:49+5:30
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भिरडवाडी स्थित रहिवासी मानसिंग झांझोटे हे कुटुंबीयांसह बुधवारी सकाळी ७ वाजता मुलाच्या साक्षगंधासाठी भुसावळला गेले होते. ममता झांझोटे या गुरुवारी सकाळी मानसिंग झांझोटे यांच्या घरासमोरून जात असताना, दीर मानसिंग यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून घरात प्रवेश केला असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात त्यांनी तत्काळ डाबकी रोड पोलिसांना कळविले. मानसिंग झांझोटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. मानसिंग यांच्या सांगण्यानुसार, घरात लहान तीन सोन्याचे नेकलेस, कानातील झुमक्यासह ३० ग्रॅमचे दागिने अंदाजे किंमत ५० हजार रुपये, एक ५ ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत दहा हजार रुपये, १५ ग्रॅम सोन्याच्या दोन चैन किंमत अंदाजे २० हजार रुपये, पाच ग्रॅम पांचाली पोत, तसेच लहान मुलांचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा माल लंपास केला.
या प्रकरणी ममता झांझोटे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.