घरफोडी तर केलीच, चिठ्ठी लिहून चोरट्यांनी दिली धमकी!
By नितिन गव्हाळे | Published: August 30, 2023 07:01 PM2023-08-30T19:01:54+5:302023-08-30T19:03:37+5:30
खिडकीपुऱ्यातील घटना: दोन लाखांचा ऐवज लांबविला, गुन्हा दाखल
अकोला: जुने शहरातील खिडकीपुरा येथील जडीबुटी विक्रेता कुटूंबासह लग्नात गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील भागातून प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १ लाख ९८ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. एवढेच नाहीतर चोरट्यांनी चिठ्ठी लिहून त्यात तुम्ही दुकानाची चिंता करा, बंगला आम्हीच घेऊ असे म्हणत, धमकी दिली. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खिडकीपुऱ्यातील मोहम्मद युनूस मो. फारूख(३५) यांच्या तक्रारीनुसार ते जडीबुटी विक्रेता असून, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुटूंबासह एका लग्नात गेले होते. रात्री ८.३० वाजता घरी परतल्यावर त्यांना घरातील लोखंडी कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त दिसले. लॉकरची पाहणी केली असता, तील १५ ग्रॅमचा सोन्याचा हार, ६.५ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, २ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, ५ ग्रॅमचे सोन्याचे तार, ५ ग्रॅमचे बाली, ४ ग्रॅमचे सोन्याचे मणी, चांदीची चैनपट्टी आणि रोख १ लाख रूपये चोरट्यांनी चोरून नेले. तसेच लोखंडी कपाटात हिंदी भाषेत लिहिलेली चिठ्ठी आढळून आली.
या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार नितीन लेव्हरकर करीत आहेत.