अकोला-अकोट मार्गावर बस उलटली; ४७ प्रवाशांचे वाचले प्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:21 AM2018-03-12T01:21:44+5:302018-03-12T01:21:44+5:30
आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावर अकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावातील ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेऊन बाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावरअकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावातील ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेऊन बाहेर काढले.
अकोट आगाराची एमएच ४० वाय ५३२८ क्रमांकाची बस अकोला येथून ४७ प्रवासी घेऊन ११ मार्च रोजी सकाळी अकोटकडे जात होती. अकोटकडे जाणारी बस अकोटकडून येणाºया वाहनाला मार्ग देण्याच्या प्रयत्नात उगवा फाट्याजवळ उलटली. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करीत होते. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले पाळोदी येथील चेतन शर्मा यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे अकोट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राऊत यांनी त्यांच्या सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ अकोला येथे पाठविले. या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने वाहतूक नियंत्रक विभागाच्या पोलीस कर्मचाºयांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताचे वृत्त समजताच राज्य परिवहन अकोला विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अकोला-अकोट रोडचे रुंदीकरणाचे काम करताना वाहन वाहतुकीची काळजी घेण्यात आली नसल्याने सदर अपघात झाला. जखमींना बाहेर काढण्यासाठी उगवा, आगर, पाचमोरी, पाळोदी येथील अनेक वाहनचालकांनी सहकार्य केले.
वाहनांच्या लागल्या रांगा
अकोट - अकोला मार्गावर आधीच रस्ता दुरुस्तीमुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच बस रस्त्यावरच उलटल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच वाहतूक सुरळीत केली.
रस्ता रुंदीकरणामुळे एकेरी वाहतूक
अकोला-अकोट रोडचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने सुकोडा फाटा ते उगवा फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच अपघाताची संख्या वाढली आहे. रविवारी सकाळी पाऊस झाल्याने चालकांच्या अडचणीत वाढच झाली होती.