बसची ट्रकला धडक; ३२ प्रवाशी जखमी
By admin | Published: January 29, 2015 12:44 AM2015-01-29T00:44:19+5:302015-01-29T00:44:19+5:30
राष्ट्रीय महामार्ग सहा वरील दाळंबीजवळची घटना.
मूर्तिजापूर/बोरगाव मंजु (जि. अकोला): भरधाव बसने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील ३२ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दाळंबी गावाच्या वळणावर बुधवार, २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. जखमींना अकोला येथील सवरेपचार व मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिखली आगाराची एम.एच. २0 बी.एल. १९३0 क्रमांकाची बस नागपूर येथून परतीच्या प्रवासाला चिखलीकडे जात होती. मूर्तिजापूर येथून निघाल्यानंतर सकाळच्या सुमारास दाळंबी गावानजीकच्या वळणावर समोरच्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने सदर बस ट्रकवर आदळली. बसची धडक लागल्यानंतर ट्रकचालक तेथून सुसाट वेगाने पसार झाला. या अपघातात बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले. यापैकी ३0 जणांना किरकोळ स्वरुपाच्या इजा झाल्या. तर अमरावती येथील प्रवीण गायधने व मूर्तिजापूर येथील विमल भटकर यांना जास्त मार लागला. जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले, तर तीन प्रवाशांना मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. आमदार हरीश पिंपळे यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्यास मदत केली. यावेळी महामंडळाच्यावतीने वाहतूक नियंत्रक एस.आर. घुरडे, आगार सचिव विजय साबळे, संतोष घोगरे, सचिन सरोदे यांनी जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.