...अखेर गांधीग्रामच्या पुर्णा नदीवरील अस्थाई पुलावरून बस वाहतुक सुरू
By Atul.jaiswal | Published: April 6, 2023 05:14 PM2023-04-06T17:14:17+5:302023-04-06T17:14:54+5:30
पर्यायी मार्ग लांब अंतराचा असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
अकोला : अकोला ते अकोट मार्गावरील गांधीग्राम येथे पुर्णा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेल्या अस्थाई पुलावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा गुरुवार, ६ एप्रिलपासून सुरु करण्यात आली. अकोला ते अकोट या दोन शहरांदरम्यानची बस वाहतुक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.राष्ट्रीय महामार्ग १६१ अ अकोला ते अकोट या मार्गावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात क्षतीग्रस्त झाल्यामुळे या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
पर्यायी मार्ग लांब अंतराचा असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येवर तात्पुरता पर्याय म्हणून गांधीग्राम येथे नदी पात्रात अस्थायी पुल उभारण्यात आला. गत १८ मार्चपासून या पुलावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा सुरु झाली. एसटी महामंडळाने प्रशिक्षण वाहनाद्वारे मंगळवार, ४ एप्रिल रोजी या अस्थाई पुलाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला. विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी गुरुवार, ६ एप्रिलपासून अकोट मार्गावरील आंतरराज्य, मध्यम लांब पल्ला, विना वाहक, शटल व जलद सर्व प्रकारची नियते सुरु करण्याचे परिपत्रक ५ एप्रिल रोजी काढले. त्यानुसार गुरुवारपासून अकोट मार्गावरील बससेवा सुरु करण्यात आली.