ग्रामीण भागातील बससेवा अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:34+5:302021-06-16T04:26:34+5:30
वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले! वाडेगाव : वाडेगावमार्गे माझोड, गोरेगाव-अकोला या मुख्य मार्गाची दुरवस्था झाल्याने नकाशी येथील ग्रामस्थांनी नकाशी बसस्थानकावर ...
वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!
वाडेगाव : वाडेगावमार्गे माझोड, गोरेगाव-अकोला या मुख्य मार्गाची दुरवस्था झाल्याने नकाशी येथील ग्रामस्थांनी नकाशी बसस्थानकावर १८ नोव्हेंबर रोजी वाहने अडवून रास्ता रोको केला होता. आश्वासनानुसार रस्त्याचे काम सुरू झाले होते. परंतु आता पुन्हा रस्त्याचे काम रखडले आहे. डिझेल अभावी रस्त्याचे काम थांबल्याची माहिती आहे.
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन रखडली!
पातूर: तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील वृद्धांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यांना मानधन देण्याची मागणी होत आहे.
प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचा लाभ द्या
निहिदा : पिंजर परिसरात प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ द्यावा, अशी मागणी पिंजर ग्रा.पं. सदस्या विजया गजानन गावंडे यांनी बार्शीटाकळी तहसीलदारांना बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. प्रधानमंत्री जीवनदायी योजनेंतर्गत गोरगरीब रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो. ही गोरगरिबांसाठी फायद्याची आहे. मात्र, पिंजर येथील नागरिकांना योजनेची माहिती नाही व त्याचा लाभसुद्धा लोकांना मिळत नाही.
मूर्तिजापूर शहरात सीसी कॅमेरे लावणे गरजेचे
मूर्तिजापूर: शहरात चार मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी मंगळवारी निवेदन दिले.
मूर्तिजापूर नगरपरिषदेने मुख्य मार्गावर अनेकदा अपघात, चोरीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत अनेक विकासकामांकरिता निधीची मागणी करून सीसी कॅमेरे बसविण्याची मागणी केली.
ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
अकोट : डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी दर वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, सद्यस्थितीत मशागती ट्रॅक्टरद्वारे केल्या जात आहेत. खरीप हंगामात लागवडीची कामे सुरू असल्याने शेतकरी व्यस्त आहेत.
शिरपूर परिसरात अवैध वृक्षतोड
खेट्री : आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत शिरपूर परिसरात वृक्षांची कत्तल होत असून, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले.
ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी
अकोटः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खानापूर मार्गावर साचले पाणी
पातूर : शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चौकाच्या बाजूला खानापूर मार्गावर नालीचे पाणी साचल्याने वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
उघड्यावर मांसविक्री; आरोग्य धोक्यात!
आगर : येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये रस्त्यालगत मांसविक्री केली जात आहे. रस्त्यावर घाण फेकली जात असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन गावात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.
वाडेगावात अवैध गुटख्याची विक्री जोरात
वाडेगाव : बाळापूर पोलीस स्टेशनंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी वाडेगाव परिसरात गत अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री जोरात सुरू आहे. अनेक युवका व्यसनाधीन होत असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वाडेगाव-देगाव रस्त्याचे काम निकृष्ट
वाडेगाव : गत महिन्यांत रस्त्याचे काम करण्यात आले;मात्र सद्यस्थितीत रस्त्यावर खड्ड्यांमधून गिट्टी उखळत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.
टिटवन-किनखेड रस्त्याची दुरवस्था
बार्शीटाकळी : तालुक्यातील टिटवन-किनखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
लोहारा परिसरात रेतीची अवैध वाहतूक सुरूच!
लोहारा : बाळापूर तालुक्यातील लोहारा परिसरात मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच असून, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रेतीमाफिया भरदिवसा नदीपात्रात अवैध उत्खनन करीत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
पथदिवे बंदच; ग्रामस्थ त्रस्त!
निहिदा : परिसरातील अनेक गावात पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पथदिवे बंद असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.