बस, रेल्वे रिकाम्या; प्रवासी घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:52+5:302021-06-09T04:23:52+5:30
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, त्यामुळे महाराष्ट्राची लालपरी व रेल्वे सेवाही बंद होती. ...
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, त्यामुळे महाराष्ट्राची लालपरी व रेल्वे सेवाही बंद होती. राज्यात सोमवार, ७ जूनपासून अनलॉक प्रक्रियेद्वारे निर्बंधांमध्ये सूट मिळत असल्याने एसटी महामंडळाकडून बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे; मात्र बसमध्ये प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असून, हीच स्थिती रेल्वे स्थानकातही दिसून आली. दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
अनलॉक प्रक्रियेदरम्यान निर्बंधात सूट मिळाल्याने सोमवारपासून नागपूर, औरंगाबाद, जळगाव खान्देश जिल्ह्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत.
सोमवारपासून अकोला, अकोट आगारातून काही बसेस लांब पल्ल्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे गत काही दिवसांपासून आगारात बस धूळ खात उभ्या होत्या. निर्बंध शिथिल झाल्याने आता सोमवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस धावत आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून आला असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुलडाणा, अमरावती जिल्ह्यासाठी फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नव्या बसस्थानकात गर्दी होती, तर जुन्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला.
--------------------------------------------
रेल्वेने मुंबई, पुण्याला प्रवाशांची गर्दी
रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्याना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्थानकाहून मुंबई व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गाडीतही गर्दी दिसून येत आहेत.
--------------------
अकोला-मानोरा- दिग्रस व अकोला-खामगाव-बुलडाणा बस गाड्यांमध्ये गर्दी
लालपरी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातील नव्या बसस्थानकातून अकोला-मानोरा-दिग्रस व अकोला-खामगाव-बुलडाणा या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. यावेळी अनेक प्रवासी विनामास्क दिसून आले. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला होता.
-------------------------
अत्यावश्यक कामासाठीच प्रवास
कोरोनाची धास्ती आहे, मात्र अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावेच लागते. सकाळी बसने निघालो, तर पूर्ण बस रिकामी होती; मात्र सायंकाळी बस हाऊसफुल्ल आहे. न
-मधुकर सावके, रा. हिरंगी, बस प्रवासी.
-----------------------------
पुणे येथे अत्यावश्यक कामासाठी गेलो होतो. रेल्वेने प्रवास चांगला झाला. रेल्वेचे रिझर्व्हेशन हाऊसफुल्ल होते. प्रवाशांनी काळजी घेऊनच प्रवास करावा. कोरोनाचे संकट कायम आहे.
-शिवम मात्र, रा. पातूर, रेल्वे प्रवासी.
--------------------------------------