नाफेड केंद्रावर आतापर्यंंत १.१५ लाख क्विंटल तूर खरेदी!
By Admin | Published: March 11, 2017 02:03 AM2017-03-11T02:03:31+5:302017-03-11T02:03:31+5:30
१५ एप्रिलपर्यंंत तूर खरेदी; आणखी ५0 हजार क्विंटल तूर येईल!
अकोला, दि. १0- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर जिल्हय़ातील शेकडो शेतकरी गर्दी करीत आहेत. नाफेडच्या केंद्रावर दररोज हजारो क्विंटल तूर विक्रीसाठी येत असल्याने शेतकर्यांना मापासाठी वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंंत नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर १ लाख १५ हजार क्विंटल तुरीचे खरेदी झाली असून, आणखी ५0 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी येण्याचा अंदाज आहे.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकर्यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन भरघोस झाल्यामुळे यंदा दर घसरले आहेत. अडत्यांकडून तुरीला ४000 ते ४२00 रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे ३0 ते १00 क्विंटल तुरीचे उत्पादन झालेला शेतकरी शासकीय तूर खरेदी केंद्रावर गर्दी करीत आहे; परंतु १0 ते १५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अडत्यांकडे जाऊन तुरीची विक्री करीत आहेत. बाजारात तूर आणण्यासाठी द्यावे लागणारे वाहनाचे भाडे आणि मापासाठी सात ते आठ दिवस करावी लागत असलेली प्रतीक्षा लक्षात घेता, वाहनमालकाला भाडे देणे शक्य नसल्याने, किरकोळ शेतकरी अडत्याकडे जात आहेत; परंतु ज्या शेतकर्यांकडे ट्रॅक्टरसह इतर मालवाहू वाहने आहेत. तेच नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अडत्याच्या तुलनेत नाफेडचा भाव अधिक असल्यामुळे शेतकरी आठ दिवस थांबून तुरीची विक्री करीत आहेत. गेल्या दिवसात नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनने ७५ हजार क्विंटल तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ४0 हजार क्विंटलची तूर खरेदी केली आहे. सध्या नाफेडच्या केंद्रावर बारदाण्याचा साठाही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला.
त्यामुळे आणखी दोन महिने बारादाणा पुरेल, अशी अपेक्षा नाफेडच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. तुरीची वाढलेली आवक पाहता, नाफेडकडून १५ एप्रिलपर्यंंत तूर खरेदी करण्याची शक्यता नाफेडच्या अधिकार्यांनी व्यक्त केली.