नाेंदणी केली ना? मग हरबरा खरेदी करा! अन्यथा कार्यालयाला कुलूप ठाेकणार; ठाकरे गटाचा इशारा
By राजेश शेगोकार | Published: April 25, 2023 06:01 PM2023-04-25T18:01:52+5:302023-04-25T18:02:30+5:30
बाजार समितीत गत चार-पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत.
अकाेला : हरभरा खरेदीसाठी असलेले नाफेडचे जिल्हा पोर्टलच दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत गत चार-पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे आक्रमक हाेत शिवसेना ठाकरे गटाने मंगळवारी विदर्भ सहकारी विपनन महासंघाच्या कार्यालयात ठिय्या दिला. नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हरबरा खरेदी करा अन्यथा कार्यालयाला कुलूप ठाेकू असा इशारा यावेळी देण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शिवसैनिकांनी विदर्भ सहकारी विपनन महासंघाच्या कार्यालयात धडक दिली. केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५,३३५ रूपये क्विंटल हमीभाव जाहीर केला. खरेदी सुरू झाल्यापासून नाफेडद्वारा साधारणपणे चार लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडद्वारे जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने आता खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे. असा आराेप त्यांनी केला त्यामुळे नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हरबरा खरेदी करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.
यावेळी जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, अकाेला पूर्व मतदारसंघाचे प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख याेगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपूते, ज्ञानेश्वर गावंडे, पवन पवार, राजेश टाेहरे, साेनु भरकर ,भास्कर अंभाेरे, जिवन राऊत, गजानन मानवतकार, उमेश राऊत ,धिरज पवार आदींची उपस्थित हाेते.
पणन सचिवांसाेबत संवाद
आ.देशमुख यांनी थेट पणनचे सचिव अनुप कुमार यांच्याशी माेबाईल फाेनवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धारेवर धरले. नाफेडची खरेदी बंद झाल्याने गत चार दिवसांपूर्वी ४ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल असलेला हरभरा सोमवार, दि.२४ एप्रिल रोजी ४ हजार ३५० प्रति क्विंटल विक्री झाला असल्याचे सांगत हे शेतकऱ्यांच्या विराेधात षडयंत्र असल्याचा आराेप त्यांनी केला. हरबरा खरेदी न केल्यास पुढील आठवडयात कार्यालयाला कुलूप ठाेकण्याचा इशाराही त्यांनी सचिवांना दिला.