हमीदरापेक्षा कमी भावानेच मुगाची खरेदी
By admin | Published: September 3, 2016 02:27 AM2016-09-03T02:27:21+5:302016-09-03T02:27:21+5:30
पणन संचालकांचे आदेश धाब्यावर; गरजेपोटी शेतक-यांकडून विक्री.
खामगाव (जि. बुलडाणा) : मुगाची १ सप्टेंबरपासून ५२२५ रुपये प्रतिक्विंटल या हमीदराने खरेदी करण्याचे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी दिले आहेत; मात्र असे आदेश असतानासुद्धा जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये व्यापार्यांकडून हमीदरापेक्षा कमी भावात मुगाची खरेदी केल्या जात असून, शेतकर्यांची अडवणूक केल्या जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
एकीकडे सर्वच वस्तुंची भाववाढ होताना शेतमाल उत्पादनांसाठी आवश्यक कृषी निविष्ठांचे दर वाढले आहेत. यामुळे एकरी उत्पादन खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच दरवर्षी अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटसुद्धा पिकावर असते. यामुळे शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी ओरड शेतकर्यांकडून केल्या जाते. त्यामुळे शासनाने शेतमालास हमीदर जाहीर केले आहेत. या हमीदरानुसार ४८00 रुपये व बोनस ४२५ रुपये असे ५२२५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मुगाची खरेदी व्हायला हवी; मात्र १६ ऑगस्टपासून नवीन मुगाची बाजारात आवक झाल्यावर हमीदर ४८00 रुपये यापेक्षा कमी भावाने मुगाची खरेदी करण्यात आली. याची दखल घेत राज्याचे सहकार, पणन मंत्री ना.सुभाष देशमुख यांनी १ सप्टेंबरपासून हमीदरानेच मुगाची खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र असे असताना सुद्धा बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली,खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ सप्टेंबरनंतरही हमीदर मुगाला मिळत नाही. त्यामुळे पणन विभागाचे आदेश धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
२ सप्टेंबर रोजी कृउबासमध्ये मुगाचे विक्रीदर
जळगाव जामोद : ४२00 - ४५00
शेगाव : ४३00 - ४८५0
संग्रामपूर : ४२00
मलकापूर : ४५00 - ४८८0
नांदुरा : ४३९0 - ४८५0
खामगाव : ४७00 - ५३00
चिखली : ३६२0 - ४३७१
देऊळगाव राजा : ४४00 - ४५५१