सोयाबीनची सोमवारपासून हमीभावाने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:53 AM2017-10-12T01:53:16+5:302017-10-12T02:04:22+5:30

अकोला : बाजारातील सोयाबीनचे भाव पाहता येत्या सोमवारपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार केंद्रावर सोय केली जात आहे, त्याठिकाणी मूग, उडिदासोबतच सोयाबीनची खरेदी प्रतिक्विंटल ३0५0 रुपये दराने होणार आहे.

Buy soybean guaranteed on Monday | सोयाबीनची सोमवारपासून हमीभावाने खरेदी

सोयाबीनची सोमवारपासून हमीभावाने खरेदी

Next
ठळक मुद्देमूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीचे आवाहनमूग, उडीद विक्रीसाठी ७८२ शेतकर्‍यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाजारातील सोयाबीनचे भाव पाहता येत्या सोमवारपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार केंद्रावर सोय केली जात आहे, त्याठिकाणी मूग, उडिदासोबतच सोयाबीनची खरेदी प्रतिक्विंटल ३0५0 रुपये दराने होणार आहे.  
जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करीत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी सुरू झाली आहे. त्यासाठी एनईएमएल या संस्थेकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पावसामुळे धान्यातील ओलावा वाढण्याची शक्यता असल्याने खरेदीचा वेग मंदावला आहे. 
त्यातच आता सोयाबीनचे भावही प्रचंड घसरले. व्यापारी २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांकडून ते खरेदी करत आहेत. त्यातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी हमीभाव ३0५0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जाणार आहे. 
 खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचे एफएक्यू दर्जाचे सोयाबीन, मूग, उडीद या धान्याची खरेदी केली जाईल. त्याची विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात ऑनलाइन माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा, या आधारे केंद्रात खरेदी केली जाईल. 

चार केंद्रांवर सोय
सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने जिल्हय़ातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

मूग, उडीद विक्रीसाठी ७८२ शेतकर्‍यांची नोंदणी
हमीभावाने विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन माहिती दाखल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मंगळवारपर्यंत ७८२ झाली आहे. त्या शेतकर्‍यांना मूग, उडीद विक्रीसाठी ठरलेल्या दिवशी केंद्रावर आणण्यासाठी मेसेज दिला जाणार आहे. त्यामध्ये अकोला केंद्रात-३५७, अकोट-२३३, तेल्हारा-६२, मूर्तिजापूर-१३0 शेतकर्‍यांनी नोंदणी केली, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांनी सांगितले. सोयाबीन विक्रीसाठी शेतकर्‍यांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

Web Title: Buy soybean guaranteed on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.