मोबाइलवर लिंक पाठवून महिलेला अडीच लाखाने घातला गंडा; पाेलिस ठाण्यात तक्रार
By आशीष गावंडे | Published: April 3, 2024 10:19 PM2024-04-03T22:19:42+5:302024-04-03T22:19:46+5:30
महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यामधून २ लाख ६४ हजार ४३९ रूपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले
अकोला: क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करुन देण्याच्या नावाखाली एका महिलेच्या माेबाइलवर लिंक पाठवून एका भामट्याने २ लाख ६४ हजार रुपयाने गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी २ एप्रिल रोजी फिर्यादीने खदान पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली असता, पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गाेरक्षण राेडस्थित किर्ती नगरातील एका महिलेला अज्ञात आरोपीने तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले असून, ते पुन्हा सुरू करून देतो, असे सांगत महिलेच्या मोबाइल फोनवर एक लिंक पाठविली. तसेच महिलेला एक अर्ज भरायला सांगितला. त्यानुसार महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यामधून २ लाख ६४ हजार ४३९ रूपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय शेळके (५९) रा. किर्ती नगर, गोरक्षण रोड यांनी दिलेल्या खदान पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, आयपीसी सहकलम ६६(डी), आयटीअॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे करीत आहेत.