पोटनिवडणुकीत भाजपाच्या अहल्या गावंडे विजयी
By Admin | Published: January 12, 2016 01:49 AM2016-01-12T01:49:40+5:302016-01-12T01:49:40+5:30
सिरसो अकोला जिल्हा परिषद गट निवडणुकीत भारिपचे सुधीर ठोकळ पराभूत.
मूर्तिजापूर : अकोला जिल्हा परिषदेच्या सिरसो गटाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अहल्या गजानन गावंडे या त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भारिप-बमसंचे उमेदवार सुधीर ठोकळ यांच्यावर १२७ मताधिक्य मिळवून विजयी झाल्या. सिरसो गटाचे सदस्य गजानन गावंडे यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा भाजपने अहल्या गजानन गावंडे यांच्या रूपाने कायम राखली आहे. भारिप-बमसंने त्यांच्या विरोधात सुधीर ठोकळ यांना उमेदवारी दिली होती. तथापि, गावंडे यांनी ४,७८८ मते मिळवून विजय संपादन केला. ठोकळ यांना ४,६६१ मते मिळाली. अहल्या गावंडे या १२७ मताधिक्याने निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गजानन निपाणे यांनी जाहीर केले. भारिप-बमसं आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली. या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे व अन्य राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले नव्हते. अपक्ष लीलाबाई महादेव खांडेकर यांना २0५ मते मिळाली. १0६ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. मतदानाबाबत फारसा उत्साह दिसून न आल्याने ५0 टक्केच मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी गजानन निपाणे यांना या कामी साहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार वैभव फरतारे, प्रदीप गणोरकर, उमेश बनसोड, आर. एम. पाचरणे, तलाठी विशाल काटोले, मुकेश गोमासे, धीरज चव्हाण, लक्ष्मण देशमुख, संजय इसाळकर यांनी सहकार्य केले.