लातूर येथे काेचिंग क्लासेसला परवानगी; अकाेल्यात कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:56+5:302021-01-16T04:21:56+5:30
अकाेला : लातूर येथे नववीच्या पुढील वर्गांसाठी खासगी काेचिंग क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. केवळ शंका निरसनासाठी ...
अकाेला : लातूर येथे नववीच्या पुढील वर्गांसाठी खासगी काेचिंग क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. केवळ शंका निरसनासाठी वर्ग घेण्याची परवानगी लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अकाेलेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे खासगी शिकवणी वर्गांना परवानगी कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागील दहा महिन्यांपासून शहरातील खासगी शिकवणी संचालक विद्यार्थ्यांना माेबाईलद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षणाचे धडे देत आहेत. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम हाेत असून, ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये डाेकेदुखी व डाेळ्यांचे विकार वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता नववी, दहावी तसेच बारावीप्रमाणे ऑफलाईननुसार खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी पालकांमधून हाेत आहे. दरम्यान, लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नववीच्या पुढील वर्गांसाठी खासगी काेचिंग क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी दिली आहे. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना काेराेना नियमावलीचे पालन बंधनकारक केले आहे. एकावेळी वर्गात २५ पेक्षा अधिक विद्यार्थी नसतील, अशी सूचना देण्यात आली असून, त्यांच्यासाठी ४५ ते ६० मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही मर्यादित स्वरूपात काेचिंग क्लासेसला परवानगी देण्याची मागणी प्रकर्षाने हाेत आहे.
खासगी काेचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत काेणत्याही सूचना प्राप्त नाहीत. मार्गदर्शक सूचनेनंतरच निर्णय घेता येईल.
-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी
शासनाने काेराेना नियमांचे पालन करण्याच्या अटीखाली नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरु केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीचा निर्णय घेतल्यास आम्हीही नियमांचे पालन करू.
- नितीन बाठे, संचालक, समर्थ काेचिंग क्लासेस
ऑनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम हाेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, आम्ही नियमांचे पालन करण्यास तयार आहाेत.
- ललित काळबांडे, संचालक, ललित ट्युटाेरिअल्स
लातूरसह इतर माेठी शहरे काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरली हाेती. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात जिल्ह्यांसाठी वेगवेगळा न्याय नसावा. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यास नक्कीच नियमांचे पालन करून क्लासेस सुरु केले जाऊ शकतात.
- अजय देशपांडे, संचालक, मिग्स काेचिंग क्लासेस