कॅल्शियम कार्बाइडने कर्करोगासह अनेक आजारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:33 PM2019-05-28T12:33:16+5:302019-05-28T12:33:24+5:30
कर्करोग, पोट बिघडणे यासह मज्जासंस्थेवर प्रभाव होत असल्याने हे फळ आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती आहे.
- सचिन राऊत
अकोला: कॅल्शियम कार्बाइड, इथिलीन स्प्रे अन् पावडर याचा आंबा, केळी, टमाटर आणि पपई यासारखी फळे पिकविण्यासाठी आणि त्याला विशिष्ट रंग येण्यासाठी सर्रास वापर होत असून, ही फळे नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे खाल्ल्यानंतर त्याचे दुरगामी परिणाम होत असून, कर्करोग, पोट बिघडणे यासह मज्जासंस्थेवर प्रभाव होत असल्याने हे फळ आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती आहे.
हे आहेत विषारी घटक
कॅल्शियम कार्बाइडमध्ये फॉस्फरस हायड्राइड आणि आर्सेनिक हे विषारी घटक आहेत. तर इथिलीनमध्ये हायड्रोकार्बन वायू असून, याचेही काही दुष्परिणाम असल्याची माहिती आहे.
या आजारांचा धोका
कर्करोग, पोट बिघडणे, मज्जासंस्थेवर प्रभाव करणे, मलेरिया, डायरिया, तोंडात फोड येणे, डोकेदुखी, मूड खराब होणे, स्मृतिभ्रंश होणे आणि झोप येणे यासारखे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बाइड हे प्रचंड धोकादायक आहे.
आरोग्यावर दीर्घकाळाने परिणाम
कॅल्शियम कार्बाइड तसेच इथिलीनचे प्रमाणापेक्षा अधिक वापर झालेली फळे खाल्ल्यानंतर शरीरावर त्याचे दीर्घकाळाने परिणाम जाणवतात. ज्या प्रमाणे गुटखा खाणाऱ्यास त्याचे वाईट परिणात बºयाच वर्षानंतर जाणवतात तसेच कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीनच्या अधिक वापराची फळे खाल्ल्यानंतर जाणवत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे ओळखणे कठीणच
कॅल्शियम कार्बाइडने पिकविलेली आणि इथिलीन स्प्रे किंवा पावडरने रंग आलेली फळे ओळखणे फार कठीण असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र अशा प्रकारे पिकविलेला आंबा खाताना तोंडात किंचित जळल्याची जाणीव होते. तर कृत्रिमरीत्या फळ पिकविताना रंगेहात पकडणे आणि सदर फळ व कॅल्शियम कार्बाइडचे नमुने घेऊन तपासणी करणे हाच पर्याय असल्याची माहिती आहे.
गरम आणि गॅसमुळे पिकतात फळ
कॅल्शियम कार्बाइडची एक पुडी बांधून गोदामात ठेवल्यानंतर त्याचा प्रचंड गॅस तयार होतो तसेच तापमानही वाढते. त्यामुळे एक आंबा सुरुवातीला पिकतो व त्या गॅसद्वारे गोदामातील आंबे काही दिवसात, तर काही तासातच पिकतात. कमी तापमान असलेल्या ठिकाणी याचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचेही वास्तव आहे. यामध्ये कोकण या भागात याचा वापर जास्त होतो.