मुंबईहून दुचाकीने आले अकोल्यात; मुलगा निघाला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:29 AM2020-05-20T09:29:24+5:302020-05-20T09:29:46+5:30
मुंबई येथून दुचाकीने अकोला शहर गाठलेल्या ‘त्या’ कुटुंबातील मुलगा पॉझिटिव्ह निघाल्याची बाब मंगळवारी अहवालाद्वारे उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूची साखळी खंडित व्हावी या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्या नाकाबंदीचा ससेमिरा चुकवत चक्क मुंबई येथून दुचाकीने अकोला शहर गाठलेल्या ‘त्या’ कुटुंबातील मुलगा पॉझिटिव्ह निघाल्याची बाब मंगळवारी अहवालाद्वारे उघडकीस आली. त्यामुळे माहेरी आलेल्या मुलीवर जावयासह सासरकडील एकूण १२ लोकांवर घशातील स्त्रावाचे नमुने देण्याचा प्रसंग ओढवला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे भीतीपोटी तसेच हातातील रोजगार हिरावून गेल्याच्या चिंतेने बाहेरगावी गेलेले नागरिक शहरामध्ये परत येत आहेत. मुंबई येथे काम करणाऱ्या पाच जणांचे कुटुंबीय पोलिसांचा ससेमिरा चुकवित चक्क दोन दुचाकीने अकोला शहरात दाखल झाले. पश्चिम झोनमधील हद्दवाढ क्षेत्रातील भागात माहेरी आलेल्या या महिलेच्या ११ वर्षीय मुलाची अचानक प्रकृती बिघडली. त्याची लक्षणे पाहता मनपाने घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठविले. मंगळवारी सदर मुलाचा अहवाल प्राप्त झाला असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच कुटुंबीयांना धक्का बसला.
ही बाब लक्षात घेता मनपाचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांनी संबंधित कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना घशातील स्त्रावाचे नमुने देण्यासाठी भरतीया रुग्णालयात पाठविले. या रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून, चाचणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
नाकाबंदी वादाच्या भोवºयात
केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी घोषित केल्यामुळे जिल्हा व पोलीस यंत्रणेची रीतसर परवानगी घेऊनच नागरिकांना जिल्ह्यात दाखल होता येते. दोन दुचाकीच्या मदतीने शहरात दाखल झालेल्या कुटुंबीयांमुळे पोलिसांची नाकाबंदी वादाच्या भोवºयात सापडली आहे. कोरोनाच्या प्रसाराला ही बाबही कारणीभूत ठरत आहे.