‘त्या’ युवकाच्या मृतदेहाचे ‘इन-कॅमेरा’ पोस्टमार्टेम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:23 PM2018-09-08T13:23:24+5:302018-09-08T13:25:26+5:30
या मागणीपुढे झुकत रुग्णालय प्रशासनाने त्याच्या मृतदेहाचे ‘इन-कॅमेरा’ पोस्टमार्टेम केले.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे शुक्रवारी रात्री राम सुखदेवलाल गवई या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई व मृतदेहाचे ‘इन-कॅमेरा पोस्टमार्टेम करण्याची शनिवारी मागणी केली. या मागणीपुढे झुकत रुग्णालय प्रशासनाने त्याच्या मृतदेहाचे ‘इन-कॅमेरा’ पोस्टमार्टेम केले. दरम्यान, या प्रकरणात नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भीम नगरात राहणारा राम सुखदेवलाल गवई याला गुरुवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयात वार्ड क्र. ९ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जी केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याचा भाऊ गजानन सुखदेवलाल गवई याने केला. शनिवारी सकाळी मृतक युवकाचे नातेवाईक व मित्र मंडळींनी जबाबदार डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याची, तसेच मृतदेहाचे इन-कॅमेरा पोस्टमार्टेम करण्याची मागणी लावून धरली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. त्यानंतर ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टेम करण्यात आला. परिस्थिती चिघळू नये म्हणून, सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी युवकाच्या नातेवाईक व मित्रमंडळींची भेट घेऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले.
त्रिसदस्यी चौकशी समिती गठित
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी त्रिसदस्यीय समिती गठित केली. यामध्ये डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. दिनेश नेताम व डॉ. मकरंद खुबाळकर यांचा समावेश आहे. ही समिती लवकरच अहवाल सादर करणार आहे.
चौकशी समिती गठित करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर दोषी आढळून आलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.