मजुरांकडून प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:33 PM2019-10-06T12:33:12+5:302019-10-06T12:33:17+5:30
गावात मजूर लावून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी अभियान राबवल्यानंतर आता गावात मजूर लावून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. त्यासाठीची मजुरी ग्रामपंचायतीनेच अदा करण्याचेही म्हटले आहे.
राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी (महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) प्लास्टिक गोळा करावे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. श्रमदानातून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याचे वजन करून ग्रामपंचायतीमध्ये साठवण्यात आला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात समाविष्ट गावांतून १ ट्रक (४ टन) प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी शाळांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवण्यात आली. अनेक गावांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गावांमध्ये गोळा केलेल्या कचऱ्याची आकडेवारीही तयार झाली. त्यानंतर प्लास्टिक गोळा करण्याचे काम पुढेही सुरूच ठेवावे, यासाठी ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत प्लास्टिक गोळा करण्याचा विशेष कार्यक्रम घेण्याचा आदेश देण्यात आला.
त्यामध्ये लोकसहभाग घ्यावा, घरोघरी पडलेले प्लास्टिक गोळा करावे, ग्रामपंचायतच्या हद्दीतील रस्ते, नाल्या, गावठाण क्षेत्र, समाजमंदिर, मंदिर, मंगल कार्यालय परिसरातील कचराही गोळा केला जाणार आहे. त्यासाठी मोहिमेच्या काळात मजूर लावून प्लास्टिक गोळा करावे, त्यांना देय मजुरी ग्रामपंचायतकडून दिली जाणार आहे. गोळा झालेल्या प्लास्टिक कचºयाचा अहवाल पाणी व स्वच्छता कक्षाकडे देण्याचेही बजावले आहे.