प्लास्टिकमुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:10 PM2019-10-20T13:10:56+5:302019-10-20T13:11:16+5:30
महान येथे प्लास्टिकमुक्तीसाठी किराणा दुकानांमध्ये डस्टबिन ठेवण्याचे बजावण्यात आले.
अकोला: ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्ती करण्यासोबतच स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार गावांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देत विविध सूचना दिल्या. त्यामध्ये महान येथे प्लास्टिकमुक्तीसाठी किराणा दुकानांमध्ये डस्टबिन ठेवण्याचे बजावण्यात आले.
बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर पंचायत समितीमधील गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामसेवकांना हगणदरीमुक्त टप्पा क्रमांक दोन, ग्रामपंचायतीची पडताळणी, शाश्वत स्वच्छता आराखडा, स्वच्छताग्रही मानधन, प्लास्टिक गोळा करणे, याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ राहुल गोडले, समाजशास्त्रज्ञ शाहू भगत तसेच बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, सहायक गटविकास अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी रमेश चव्हाण, दिनेश इंगळे, सुरेश मानकर, सतीश ठोंबरे व ग्रामसेवक सभेला उपस्थित होते.
तसेच बाळापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समाधान वाघ, विस्तार अधिकारी देशमुख, पंकज गवई, दीपाली महल्ले व ग्रामसेवक सभेला उपस्थित होते.
ग्रामपंचायत महान येथे प्लास्टिक निर्मूलन मोहीम व मतदान जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येक दुकानदाराला प्लास्टिक व इतर कचºयासाठी डस्टबिन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यासाठी माधुरी सरोदे, सरपंच यास्मिन परवीन, केंद्रप्रमुख गोकुलदास महल्ले, ग्रामसेवक डोगरे, मुख्याध्यापक मोहन तराळे, शफिक राहील, शिक्षक शाहीद इक्बाल खान, रउल्ला खान, सचिन जानोरकर, तन्वीर, इम्रान व शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला.