शिक्षक मतदारसंघाचा प्रचार शिगेला, कल समजेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:00 AM2020-11-25T11:00:07+5:302020-11-25T11:04:49+5:30
Teacher constituency Election News रिंगणातील कोणताच उमेदवार विजयाचा दावा करू शकत नसल्याची परिस्थिती यंदा आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. १ डिसेंबर रोजी मतदार होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नानाप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मते मिळविण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे आधीच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली. कोरोनाच्या सावटातच अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. निवडणुकीपूर्वीच अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिक्षक संघटनांनी उमेदवार जाहीर करून संपर्क सुरू केला होता; परंतु मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप वाढल्याने, उमेदवारांच्या संपर्कात खंड पडला. अचानक निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवार कामाला लागले आहेत. सध्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणुकसाठीचे मतदार १ डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानाला आठ दिवसांचा अवधी असल्यामुळे उमेदवार जीवाचे रान करीत असून, आपणच कसे योग्य उमेदवार आहोत. आपण शिक्षकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवू शकतो, हे शिक्षक मतदारांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षक मतदारसुद्धा उमेदवारांची दमछाक होईल, अशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. काही उमेदवार शैक्षणिक व शिक्षकांच्या समस्यांना बाजूला सारत, विविध आमिषे दाखवून शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गत निवडणुकीत पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची १२ हजार मते मिळविणारा उमेदवार विजय ठरला होता. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. यंदा शिक्षक मतदारांची नोंदणी कमी झाल्यामुळे सर्वाधिक शिक्षक मतदारांची पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मते खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागेल. याचा अंदाज घेणे सध्या कठीण झाले आहे. यंदा शिक्षक मतदारांची नोंदणी कमी झाल्यामुळे सर्वाधिक शिक्षक मतदारांची पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मते खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागेल, याचा अंदाज घेणे सध्या कठीण झाले आहे. गतवर्षी ४४ हजार ७२१ शिक्षक मतदार यादी होती. यंदा मात्र ही यादी ३५ हजारावरच आली आहे. त्यामुळेच उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरू आहे. शिक्षकांची मते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना उमेदवार दिसत आहे; परंतु रिंगणातील कोणताच उमेदवार विजयाचा दावा करू शकत नसल्याची परिस्थिती यंदा आहे.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीचे चित्र
गत निवडणुकीत २७ हजार ७६४ एकूण मतदान झाले होते. यात सवार्वाधिक मतदान १२ हजार १०९ मतदान श्रीकांत देशपांडे यांना झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर अरुण शेळके होते. त्यांनी ७ हजार १६७ मतदान घेतले होते. माजी आमदार वसंतराव खोटरे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. त्यांना ४ हजार ७६८ मतदान झाले होते. शेखर भोयर यांना १,४६० मते मिळाली होती; परंतु यंदा गत निवडणुकीपेक्षाही वेगळी परिस्थिती आहे. पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची ७ ते ९ हजार मते मिळविणारा उमेदवाराच या निवडणुकीत विजयी होईल, अशी शक्यता आहे.