अनधिकृत कर्मचा-यांबाबत कॅनरा बँक वरिष्ठांचे कानावर हात!
By admin | Published: March 9, 2017 03:41 AM2017-03-09T03:41:16+5:302017-03-09T03:41:16+5:30
प्रादेशिक कार्यालय, व्यवस्थापकांकडे दाखविले बोट
सदानंद सिरसाट
अकोला, दि. ८- बँकेच्या नवीन नियमानुसार, डिसेंबर २0१४ नंतर कॅनरा बँकेच्या कोणत्याही शाखेत अनधिकृत व्यक्तींना शिपाई-मदतनीस पदावर ठेवणार नाही, असे घोषणापत्र दिल्यानंतरही राज्यात शेकडो अनधिकृत कर्मचार्यांकडूनच ही कामे करून घेण्यात येत आहेत. त्यातच आता नियम आणि भरती प्रक्रियेचे निकष डावलत त्याच अनधिकृत व्यक्तींना कायम केले जात आहे. या प्रकाराबाबत बंगळुरू येथील मुख्यालयाने कानावर हात ठेवले. महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय आणि बँक व्यवस्थापकांनाच त्याबाबत विचारण्याचे सांगण्यात आले, तर हा प्रकार मुख्य कार्यालयालाच विचारा,असे प्रादेशिक कार्यालयाने सांगितल्याने या भरती प्रकरणात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
कॅनरा बँकेत सुरक्षेचा मुद्दा वार्यावर सोडत बँकेच्या शेकडो शाखांमध्ये अधिकारी-कर्मचार्यांच्या नातेवाइकांनाच शिपाई-मदतनीस म्हणून कामावर ठेवले जाते. एक-दोन वर्षातच त्याला नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव सादर करून त्याला मान्यता प्राप्त करून घेतली जाते. त्यामध्ये नातेवाइकांची लॉटरी तर लागतेच शिवाय संबंधित अधिकारी-कर्मचार्यालाही चांगलाच आर्थिक लाभ पदरात पडतो. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी बँकेच्या मुख्यालयाने ४ डिसेंबर २0१४ रोजी निर्देश दिले.
त्या निर्देशासोबतच यापुढे बँकेच्या शाखेत अनधिकृत व्यक्तीला कामावर ठेवले जाणार नाही. बँकेत तसे कर्मचारी आढळल्यास बँक व्यवस्थापकाला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे घोषणापत्रही व्यवस्थापकांकडून घेण्यात आले. त्यानंतरही बँकेच्या नवीन शाखांमध्ये शेकडो कर्मचारी अनधिकृत आहेत.
अनधिकृत व्यक्तींची नियुक्ती निश्चित
कॅनरा बँकेच्या अनेक शाखांमध्ये नागपूर येथून नवृत्त झालेल्या एका अधिकार्याने अमरावती विभागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यक्तींना नियुक्ती देण्यासाठी व्यवहार केल्याची माहिती आहे. त्यातूनच मूर्तिजापूर, माना, दर्यापूर यांसह अनेक शाखांमध्ये त्या व्यक्तीशी लागेबांधे असलेल्यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.
लोकप्रतिनिधींच्या मागणीला बगल
कॅनरा बँकेत नवीन प्रक्रियेनुसारच भरती करावी, या मागणीचे पत्र खासदार नाना पटोले, माजी आमदार हरिदास भदे यांनी बँक व्यवस्थापनाला दिले होते. त्यावर केंद्रिय वित्तमंत्री कार्यालयातून त्या पद्धतीनेच भरती केली जाईल, असेही सांगण्यात आले; मात्र कॅनरा बँकेच्या नव्या फतव्याने खासदार, आमदारांची मागणी आणि बँक व्यवस्थापनाचे आधीचे निर्देश धुडकावण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.
मुख्य कार्यालयाने या भरतीबाबत कोणतेही निर्देश महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात दिले नाहीत. हा विषय त्यांच्या स्तरावर असू शकतो. याबाबतची अधिक माहिती पुणे येथील प्रादेशिक कार्यालयालाच विचारा.
- अनिलकुमार पी. उपमहाप्रबंधक, सीईओ सचिवालय, कॅनरा बँक. बंगळुरू
भरती प्रक्रिया मुख्य कार्यालयातून केली जाते. त्यांच्या निर्देशानुसार ती पार पडते. सेवायोजन कार्यालयातील नोंदणीकृत उमेदवारांशिवाय ती करता येते. २0१४ च्या निर्देशानंतर कुठे अनधिकृत व्यक्ती असल्यास माहिती द्यावी, नव्या पाच शाखांमध्ये नियमानुसार भरती केली जाईल.
- श्री. स्वेन, प्रादेशिक कार्यालय, कॅनरा बँक, पुणे.