ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामासाठी ‘आयटीआय’ कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:20+5:302021-01-03T04:20:20+5:30
अकोला : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यालयातील कामाची निकड लक्षात घेता, ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामासाठी ‘आयटीआय’मधील ४० कर्मचाऱ्यांच्या ...
अकोला : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यालयातील कामाची निकड लक्षात घेता, ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामासाठी ‘आयटीआय’मधील ४० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणी अकोल्यातील शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी अकोल्याच्या तहसीलदारांकडे ३० डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी बहुतांश पदे रिक्त असून, रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कार्यरत कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. कार्यरत ४० कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा प्रक्रिया पार पाडण्याच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामासाठी करण्यात आलेल्या नियुक्तीचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. बी. बंडगर यांनी अकोल्याचे तहसीलदार यांच्याकडे ३० डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या काही कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी केलेली नियुक्ती रद्द करण्यात येणार येईल; मात्र निवडणुकीच्या कामासाठी सर्व (४०) कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करणे शक्य नाही.
- विजय लोखंडे
तहसीलदार, अकोला.