संभाजी भिडे यांची अकोल्यातील सभा रद्द करा!, बौध्द समाज संघर्ष समितीची मागणी
By संतोष येलकर | Published: July 29, 2023 09:18 PM2023-07-29T21:18:43+5:302023-07-29T21:19:16+5:30
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन
अकोला: वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांची ३० जुलै रोजी अकोल्यातील बाळापूर रोड भागात आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्याची मागणी बौध्द समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
संभाजी भिडे महापुरुषांविषयी नेहमी अवमानजनक वक्तव्य करतात. यापूर्वी देखिल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होण्याच्या घटना घडल्या असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या कुटुंबियांविषयी संभाजी भिडे यांनी नुकतेच अवमानजनक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अकोला जिल्हयातील पातूर व अकोला शहरात ३० जुलै रोजी संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभांमध्ये वादग्रस्त वक्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रविवार ३० जुलै रोजी जिल्हयातील पातूर येथे आणि अकोला शहरातील बाळापूर रोडस्थित मंगल कार्यालय येथे आयोजित संभाजी भिडे यांची सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी बौध्द समाज संघर्ष समिती जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी बौध्द समाज संघर्ष समितीचे अशोक नागदिवे, सम्राट सुरवाडे, प्रकाश लिंगाडे, रोहित वानखडे, आकाश शिरसाट, राजकुमार शिरसाट, अॅड. देवानंद गवइ, महेंंद्र डोंगरे, संघपाल आठवले, राहुल इंगोले, आकाश इंगळे, संतोष गवइ आदी उपस्थित होते.