स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

By admin | Published: April 20, 2017 01:38 AM2017-04-20T01:38:53+5:302017-04-20T01:38:53+5:30

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

Cancellation of cheap procurement authority | स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

Next

अकोला : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबतच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन केलेल्या चौकशीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सदर दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचा आदेश पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे, तसेच सदर दुकानदाराकडून एक लाख एक हजार ९३० रुपये शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केलेल्या धान्याच्या बाजारभावातील फरकाची रक्कम वसूल करण्याचेही आदेशित केले आहे.
पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांत धान्य वाटप केले नसल्याची तक्रार भारिपचे तालुका सचिव जीवन उपर्वट व मंगेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्याकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी चौकशी करून या स्वस्त धान्य दुकानात वाटप केले नसल्याचे दिसून आले, तसेच तेथील वजन-मापेसुद्धा प्रमाणित केली नसल्याचे आढळून आले. गावातील शिधापत्रिकाधारकांनी दिलेल्या बयाणानुसार रास्त भाव दुकानदार महिन्यातून दोन ते तीन दिवसच धान्य वाटप करतात व दोन-तीन महिन्यांतून एकदाच वाटप करतात, असे नमूद केले. या तक्रारीसंदर्भात दिग्रस बु. येथील उपसरपंच भारती सुदर्शन गवई, पोलीस पाटील, गट ग्रामपंचायत दिग्रस खुर्द हिंगणा येथील सरपंच सुमेध प्रमोद इंगळे यांनीसुद्धा तहसील कार्यालयात जाऊन या प्रकारचे लेखी जबाब सादर करून कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते माणिक गवई, तोताराम गवई, सुदर्शन गवई, मंगेश इंगळे व जीवन उपर्वट यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी रास्त भाव दुकानावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपण आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. गावातील शेकडो शिधापत्रिकाधारकांचे जबाब घेऊन चौकशीअंती रास्त भाव दुकानदार हे दोषी आढळले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिग्रस बु. येथील सदर रास्त भाव दुकानाच्या प्राधिकारपत्राची जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम शासनजमा करण्याचेही आदेशित केले. सदर रास्त भाव दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केल्याचे आढळलेल्या २१.९१ क्विंटल गहू , १५.०७ क्विंटल तांदूळ, २५ किलो ४०० ग्रॅम साखर या मालाच्या बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या फरकाची एक लाख एक हजार ९३० रुपयांची रक्कम सदर रास्त भाव दुकानदाराकडून वसूल करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे व रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. तसेच दिग्रस खुर्द येथील शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सदर दुकान नजीकच्या दुकानास जोडण्याचाही आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांनी पातूरच्या तहसीलदारांना दिला आहे.

Web Title: Cancellation of cheap procurement authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.