कर्क रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा!
By admin | Published: November 1, 2016 02:01 AM2016-11-01T02:01:57+5:302016-11-01T02:01:57+5:30
संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मशीन नाही!
राम देशपांडे
अकोला, दि. ३१- मानव सेवा सार्वजनिक धर्मादाय संस्थेच्यावतीने संचालित अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राला कर्करोग झालेल्या रुग्णांवर कमी वेळेत जास्तीत जास्त प्रभावी किरणोपचारासाठी (रेडिएशन थेरपी) 'लिनॅक' कोबाल्ट या अत्याधुनिक किरणोपचार मशीनची प्रतीक्षा लागली आहे. दिवसागणिक वाढत असलेली कर्करुग्णांची संख्या व त्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासून उपलब्ध असलेली किरणोपचार मशीन असर्मथ ठरत असल्याने, उपचारासाठी रुग्णांना महिन्यांच्या कालावधीत प्रतीक्षा करावी लागत आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षभरात कर्करोग झालेल्या ७ हजाराहून अधिक रुगणांवर उपचार केले जातात. रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यावर या ठिकाणी किरणोपचार व शस्त्रक्रिया केली जाते. माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या तंत्रज्ञानातून विकसित भाभाट्रॉन-२ कोबाल्ट मशीनद्वारे या ठिकाणी कर्करोगग्रस्त रुग्णांवर किरणोपचार केले जातात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, शेतीमध्ये फवारणीसाठी वापरले जाणारे रासायनिक द्रव्य व अन्य विविध कारणांमुळे कर्करोग्रस्त रुगणांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली असून, पूर्वीच्या तुलनेत उपचारासाठी येणार्या कर्करोग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असल्याचे संस्थाध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी सांगितले.
रुग्णालयात दिवसभरात ६0 ते ६५ रुग्णांवर किरणोपचार केले जातात. त्या तुलनेत रुग्णालयात पूर्वीपासून उपलब्ध असलेली किरणोपचार मशीन उपचार करण्यासाठी असर्मथ ठरत आहे. परिणामी, महिन्याकाठी १५ ते २0 कर्करोगग्रस्त रुग्णांना महिन्यांच्या कालावधीत किरणोपचाराकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्ष २0१३ मध्ये रुग्णालय प्रशासनाने ही बाब केंद्र व राज्य प्रशासनाला अवगत करून, रुगणालयात १0 कोटी रुपयांची अत्याधुनिक ह्यलिनॅकह्ण मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने, या ठिकाणी तब्बल दीड कोटी रुपये खर्च नव्या कोबाल्ट युनिटकरिता इमारत उभारण्यात आली. या ठिकाणी येणारे ९0 टक्के रुग्ण हे राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेत असल्याने, कर्मचार्यांचा पगार, रुग्णालयातील व्यवस्था, रुग्णांना दोन्ही वेळ दिले जाणारे नि:शुल्क भोजन आदींबाबतचा खर्च सांभाळणे रुग्णालय प्रशासनाला जोखमीचे झाले आहे. शासनाने अत्याधुनिक किरणोपचार मशीन उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी रुग्णालय प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला; मात्र याबाबत अद्यापपर्यंत कुठलीच हालचाल नसल्याची माहिती संस्थाध्यक्ष गिरीष अग्रवाल यांनी ह्यलोकमतह्णला दिली.
नव्या मशीनसाठी २0१३ पासून पाठपुरावा केला जात आहे. नव्याने होत असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला शासनाने संत तुकाराम हॉस्पिटल संलग्न करावे, अशी मागणी हॉस्पिटल प्रशासनाची आहे. जिल्हय़ातील बहुतांश रुग्ण सर्वप्रथम सर्वोपचार रुग्णालयात येतात. या व्यवस्थेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना होऊ शकतो.
- गिरीश अग्रवाल (संस्थाध्यक्ष),
संत तुकाराम हॉस्पिटल अँन्ड मेडिकल रिसर्च सेंटर, अकोला