पानठेल्यावर कर्करोग चेतावणी सूचना बंधनकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:58 PM2019-09-15T12:58:49+5:302019-09-15T12:58:58+5:30
कर्करोग चित्ररूपी सूचना फलक लावणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
अकोला: शहरासह जिल्हाभरातील पानठेल्यावर चेतावणी दर्शक कर्करोग चित्ररूपी सूचना फलक लावणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सभेला मार्गदर्शन करत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समितीला सूचना दिल्या. पानठेल्यांवर सूचना फलक लावण्यासोबतच १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ सदस्यांनी जिल्ह्यामध्ये तंबाखू नियंत्रणाबाबत विचार व्यक्त केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जनजागृतीची सुरुवात ही शाळा, महाविद्यालयांपासून होत असल्याने कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड अंतरापर्यंत तंबाखू विक्री केंद्र किंवा पानठेले हटविण्याचा आदेश यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रीती कोगदे, धम्मसेन शिरसाट, जे.बी. अवघड यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. राठोड यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाविषयी उपस्थित सदस्यांना माहिती दिली. सभेला जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, मानसशास्त्रज्ञ डॉ. दुष्यंत देशपांडे, डॉ. योगेश शाहू, प्रा. मोहन खडसे, प्रा. संकेत काळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एल.जी. राठोड, डॉ. एम.डी. राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, पी.एस.आय. सी.एम. वाघ, गीता अवचार आदी सदस्यांची उपस्थिती होती.