उमेदवारांच्या गुन्हे, संपत्तीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:28 PM2020-01-07T12:28:37+5:302020-01-07T12:28:43+5:30
मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे, यासाठी हा उपक्रम निवडणूक विभागाकडून राबवला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदांमध्ये गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत असामाजिक तत्त्वांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती होऊन योग्य उमेदवारालाच मतदान व्हावे, यासाठी गुन्हे, संपत्ती व इतरही वैयक्तिक माहितीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर पाहण्यासाठी खुले ठेवले जाणार आहे. मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे, यासाठी हा उपक्रम निवडणूक विभागाकडून राबवला जातो.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढणाऱ्यांच्या गुन्हेगारी माहितीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर झळकत असले तरी मतदारांनी त्या आरोपींनाच विजयी केल्याचे २०१७ मध्ये राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घडले आहे.
विशेष म्हणजे, त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पळवून नेणे, महिलांचे शोषण, फसवणूक, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, याची खबरदारी घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली वैयक्तिक माहिती मतदारांना दिसण्यासाठी मतदान केंद्रांत दर्शनी भागावर लावली जाते. मतदारांमध्ये जनजागृतीचा हा भाग आहे. निवडणूक आयोगाकडून ती जबाबदारी पार पाडली जात असली तरी मतदार मात्र जबाबदारी विसरून आरोपींनाच विजयी करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म’ या संस्थेने केले.
विजयी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रानुसार गुन्हेगारी पृष्ठभूमी, आर्थिक आणि वैयक्तिक माहिती संस्थेने घेतली. जिल्हा परिषदांच्या १,४३१ विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. राज्यातील एकूण विजयी गुन्हेगार उमेदवारांची पक्षनिहाय आकडेवारीही मतदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.