‘सुपर संडे’साठी उमेदवार सज्ज
By admin | Published: October 12, 2014 01:14 AM2014-10-12T01:14:29+5:302014-10-12T01:14:29+5:30
अकोला येथे प्रचार सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटीवर भर.
अकोला- विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आलेला सुटीचा दिवस, रविवार 'कॅश' करण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत. नोकदार वर्ग रविवारी घरी सापडणार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता प्रचार सभांना फाटा देऊन उमेदवार प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रचाराची धूम सुरू असली तरी खरी धूम अनुभवण्यास मिळणार आहे ती रविवार, १२ ऑक्टोबरला. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीची शेवटची सुटी असलेल्या रविवारी उमेदवारांचा भर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राहणार आहे.
निवडणूक घोषित झाल्यापासूनच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली; परंतु उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचाराला खर्या अर्थाने वेग आला. मागील दहा दिवसांपासून उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला. अधिकाधिक मतदारांची भेट व्हावी, यादृष्टीने उमेदवार ठिकठिकाणी भेटी देत आहेत. अनेक उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटत असले, तरी नोकदार मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य झाले नाही. त्यामुळे आता मतदानापूर्वीच्या शेवटचा रविवार 'कॅश' करण्याच्या दृष्टीने उमेदवार सज्ज झाले आहेत.
मतदान १५ ऑक्टोबरला होऊ घातले आहे. त्याआधी रविवार १२ ऑक्टोबर हा दिवस उमेदवारांना मतदारांच्या भेटीसाठी मिळाला आहे. रविवारी उमेदवार अधिकाधिक मतदारांच्या भेटीगाठीवर भर देणार आहेत. रविवारी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचे वेळापत्रक उमेदवारांनी निश्चित केले आहे. नोकरपेशातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांचा भर राहणार असल्याने हा रविवार उमेदवारांसाठी जास्तच 'बिझी' राहणार आहे.