उमेदवारांचे डोळे पक्ष निधीकडे!
By admin | Published: February 17, 2017 02:41 AM2017-02-17T02:41:23+5:302017-02-17T02:41:23+5:30
नेत्यांनी साधली चुप्पी; कार्यकर्त्यांची कोंडी
अकोला, दि. १६-महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने कमालीचा वेग घेतला आहे. राजकीय पक्षांकडून प्राप्त होणार्या पक्ष निधीतून संबंधित उमेदवार प्रचार साहित्य व इतर बाबींवर होणारा किरकोळ खर्च भागवतात. पाच दिवसांवर मतदानाची प्रक्रिया येऊन ठेपली असताना अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष निधी मिळाला नसल्यामुळे निवडणुकीत ऐन वेळवर दगाफटका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी चुप्पी साधणे पसंत केले असून जीवाचे रान करणार्या कार्यकर्त्यांंची मात्र कोंडी होत आहे.
महापालिकेच्या आखाड्यात यंदा प्रथमच सर्व राजकीय पक्षांनी युती किंवा आघाडीच्या फंदात न पडता स्वबळावर दंड थोपटले आहेत. भाजप-शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भारिप-बमसंने प्रतिस्पध्र्यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी जोरदार तयार केल्याचे चित्र आहे. अर्थातच, अशा अटीतटीच्या सामन्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय पक्षाचे उमेदवार सर्व ताकद झोकून कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध साहित्याची खरेदी करणे, वाहने, त्यावरील भोंगे, झेंडे, पताका, बॅनर-फलक तसेच कार्यकर्त्यांंचे चहापान आदी विषयांसाठी उमेदवारांना खर्च करावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्या उमेदवारांना आर्थिक बळ दिल्यास संबंधित उमेदवाराच्या विजयाबद्दल पक्षालासुद्धा हमी राहते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक रिंगणातील उमेदवारांसाठी पक्ष निधीची तरतूद केली जात असल्याचे बोलल्या जाते. येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून प्रचार सभा, कॉर्नर बैठकांसह छुप्या आघाड्यांसाठी होणार्या हालचालींनी वेग घेतला आहे. अशा स्थितीत अनेक उमेदवारांना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे त्यांना पक्षाकडून कधी निधी प्राप्त होतो, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.
उमेदवारांचा हात आखडता
राजकीय पक्ष कोणताही असो, त्यांनी उभे केलेल्या पॅनेलमधील अनेक उमेदवार आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण नसल्याचे आता समोर येत आहे. पक्षाकडून उमेदवारी मागताना मोठ-मोठय़ा गप्पा करणार्यांचे पितळ प्रचारदरम्यान उघडे पडले आहे. प्रचार साहित्य असो वा कार्यकर्त्यांंचे चहापान किंवा जेवणासाठी काही उमेदवारांचे हात खिशात जात नसल्यामुळे कार्यकर्त्यांंमध्ये नाराजीचा सूर आहे.
रक्कम जमा केली; पण..
निवडणुकीत होणारा खर्च लक्षात घेता काही उमेदवारांनी आपसात रक्कम जमा केली. ही रक्कम ऐन मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच संपल्यामुळे उमेदवार सैरभैर झाले आहेत. आता पुढील खर्च नेमका कसा व कोणी करायचा, असा प्रश्न उमेदवारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे.