गांजा माफियांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:23 AM2020-09-29T11:23:41+5:302020-09-29T11:23:58+5:30
पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव खुर्द व हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा या दोन ठिकाणावरून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल एक क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केल्यानंतर दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव खुर्द येथील रहिवासी राजू सोळंके याच्या निवासस्थावरून कैलास पवार व राजू सोळंके हे दोघे जण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४० किलो गांजा जप्त केला. त्यानंतर या दोघांनी दिलेल्या माहितीवरून हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा येथील रहिवासी शत्रुघ्न चव्हाण यांच्या घरातून तब्बल एक क्विंटल सहा किलो गांजा जप्त केला होता. या दोन कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एक क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केला. सदर गांजाची किंमत सुमारे २३ लाख ३६ हजार रुपये आहे. यामधील बोरवा येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला; मात्र राजू सोळंके रा. आडगाव व कैलास पवार रा. वारी हनुमान या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.