नरभक्षक अस्वल अखेर वन विभागाच्या जाळ्यात
By admin | Published: May 24, 2016 01:46 AM2016-05-24T01:46:17+5:302016-05-24T01:46:17+5:30
चिखली तालुक्यातील घटना; इंजेक्शनच्या साहाय्याने केले बेशुद्ध.
बुलडाणा : चिखली तालुक्यातील करवंड येथील रहिवासी लालसिंह सेवा पवार (५२) यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारणारे अस्वल सोमवारी वन विभागाच्या जाळ्यात अडकले. या अस्वलाला ट्रँक्यूलायझर गनच्या साहाय्याने इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले असून, रात्री उशिरा अभयारण्यात सोडून देण्यात येणार आहे. करंवड येथील शेतमजूर लालसिंह पवार हे रविवारी सकाळी ७ वाजता गावातीलच राजू राजपूत यांच्या शेतात काम करीत होते. यादरम्यान अचानक अस्वलाने लालसिंह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने लालसिंह यांना ठिकठिकाणी नखे मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चवताळलेल्या अस्वलाने त्यांच्या शरीराची चाळण केली. घटनास्थळापासून काही फूट अंतरावर हात व शरीराचे अवयव आढळले होते. या परिसरात गत १२ दिवसांत अस्वलाचा हा दुसरा हल्ला असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. या पृष्ठभूमीवर वन विभागाने रविवारी संध्याकाळपासूनच अस्वलाला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या. वन विभागाचे जलद कृती दल ताफ्यासह करवंड बिटमध्ये एका पाणवठय़वर सोमवारी सकाळपासूनच तळ ठोकून बसले होते. दुपारी १ च्या सुमारास अस्वल पाणी पिण्यासाठी आल्यावर ट्रँक्यूलायझर गनच्या साहाय्याने अस्वलाला बेशुद्ध करण्यात आले. अवघ्या चौदा मिनिटांमध्ये ही प्रकिया पार पडली. त्यानंतर या अस्वलाला पिंजर्यात टाकून बुलडाणा येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अस्वलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, ते सध्या बुलडाण्यातील राणी बगीचा येथे ठेवण्यात आले आहे.