ओढून ताणून कविता करता येत नाही - विठ्ठल वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:24 PM2020-01-20T14:24:42+5:302020-01-20T14:25:10+5:30
ओढून ताणून कविता कधीच करता येत नाही. जगत असताना अनेक अनुभव येतात. ते अनुभव कवी मनात साठवून घेतात.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: ‘रवी ताकात फिरावी, यावे काठावर लोणी, उरी घुसळलो असा, आली ओठावर गाणी’, या ओळींनी सुरुवात करू न लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सांगितले की, ओढून ताणून कविता कधीच करता येत नाही. जगत असताना अनेक अनुभव येतात. ते अनुभव कवी मनात साठवून घेतात. अनुभवांचा पाऊस काळजाच्या मातीत मुरणं महत्त्वाचे असते. यावर नंतर कधीतरी कवितांच्या ओळी कारंज्यासारख्या उसळून येतात.
लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात दुपारच्या सत्रात रविवारी कविसंमेलनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी विठ्ठल वाघ बोलत होते. कविसंमेलनामध्ये कविताप्रेमी आणि कवींच्या आग्रहास्तव विठ्ठल वाघ यांनी आपल्या अजरामर रचना सादर केल्या. यावेळी त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-प्राध्यापक यांना कानपिचक्या दिल्या. शिक्षक प्राध्यापकांना बोली भाषेचा अभ्यास असायला पाहिजे. कवितेमध्ये अर्थ गहन असतो. तो समजून घेतला तर कवितांचा आनंद घेता येतो, असे सोदाहरणासह वाघ यांनी सांगितले. यावेळी वाघ यांनी ‘लवंग’ ही कविता सादर केली.
‘आलं दणक्यात पाणी अन् नाही त्याले आराधुरा...अशा पाण्या-पावसात पोरी नको मारू येरझारा...’ या कवितेतून गजानन मते यांनी शृंगार मांडतानाच आजच्या स्त्रियांची समाजात कशी परिस्थिती आहे, यावर प्रकाशझोत टाकला. नीलेश लोंढे यांनी ‘कविता जगवते’ ही कविता सादर करू न जाती, धर्म आणि सभोवतालचे वास्तव मांडले. ममता इंगोले यांनी आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर कवितेतून भाष्य केले. दिनकर दाभाडे यांनी राजकारणावर सडेतोड टीका ‘तुमच्याविषयी दोन शब्द’ या कवितेतून केली. विजय सोसे यांनी ‘पाऊस’ ही आशयघन कविता सादर करू न रसिकांना स्तब्ध करू न टाकले. रवींद्र महल्ले यांनी ‘उमराचं फूल’ ही अंतर्मुख करणारी रचना सादर केली. मीरा ठाकरे यांनी आपल्या गोड आवाजात अस्सल वºहाडी भाषेतील कविता सादर केली. किशोर बळी यांनी ‘ती लगबग भल्या पहाटे, ते सडासारवण नाही. देखणी इमारत आहे, किलबिलते अंगण नाही’, ही मराठी गजल सादर करू न रसिकांची वाहवाह मिळविली. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी लग्नाचा आनंद आपल्या कवितेतून मांडला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आणि माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला.