लाचखोर लेखा परीक्षक अटकेत
By admin | Published: July 31, 2015 11:07 PM2015-07-31T23:07:53+5:302015-07-31T23:07:53+5:30
संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत कामाचे लेखा परीक्षण करण्यासाठी मागीतली होती ६0 हजारांची लाच.
संग्रामपूर (जि. बुलडाणा ): संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत लाडणापूर येथील कामाचे लेखा परीक्षण करण्यासाठी ६0 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी स्थानिक निधी लेखा विभागाच्या वरिष्ठ लेखा परीक्षकास दहा हजारांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाडणापूर येथे सन २0१३-१४ व २0१४-१५ या वर्षामध्ये सामान्य निधीची कामे, पाणी पुरवठा निधीची कामे तसेच १३ वा वित्त आयोगांतर्गत कामे, दलित वस्ती सुधार योजनेची कामे असे एकूण २४ लक्ष रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. सदर कामाचे लेखा परीक्षण करण्यासाठी वरिष्ठ लेखा परीक्षक विष्णू कुमरे याने ग्रा.पं. लाडणापूर अंतर्गत साधारणत: ३0 लक्ष रुपयाची कामे झाली असून, सदर रकमेच्या २ टक्क्याप्रमाणे एकूण ६0 हजारांची मागणी लाडणापूर ग्रामसेवक मनोहर पांडुरंग काळे यांच्याकडे केली होती. याबाबत ग्रामसेवक मनोहर पांडुरंग काळे (वय ४१) यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३१ जुलै रोजी दुपारी ३.३0 वाजेच्या दरम्यान संग्रामपूर येथील एका लॉजिंगच्या रूम नं. १0२ मध्ये पंचासमक्ष विष्णू बिलसुची कुमरे (वय ४८) याला १0 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. सदर लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, तामगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध कलम ७ ए १३ (१) ड सह १३ (२) ला.लु.प्र.का. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.