कार खरेदी फसवणूक प्रकरण : राष्ट्रवादीच्या नेत्या आशा मिरगे व मुलाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:36 PM2020-09-26T12:36:48+5:302020-09-26T12:37:01+5:30
न्यायालयाने मिरगे माता-पुत्रचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
अकोला : पारसकर ह्युंडाई शोरुम येथून कार खरेदी केल्यानंतर ओळखीचा फायदा घेत पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) देण्याचे आमीष देऊन ते चेक न देता शोरुम मालकाची सुमारे ४ लाख ९३ हजार ८९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायालयाने मिरगे माता मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांनी अनिमेषच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने सहा लाख ६८ हजार रुपयांची आसेंट कार ३० सप्टेंबर २०१९ रोजी पारसकर ह्युंडाई येथून खरेदी केली होती, तसेच २६ हजार रुपयांच्या अॅसेसरीज लावल्या. विवेक पारसकर यांच्याशी ओळखी असल्याने मिरगे यांनी कर्ज होत नसल्याचे कारण सांगून १०१ रुपया सुरुवातीला दिला, तसेच उर्वरित रक्कम ९ धनादेशाद्वारे देण्याचे आमीष दिले. मुलगा पुण्याला राहत असल्याने कार पुण्याला नेणार असल्याचे सांगत कारची पासिंगही तातडीने करून घेतली; मात्र पारसकर यांनी पैसे मागितले असता, आशा मिरगे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांचा धनादेश २ मार्च रोजी म्हणजेच कार खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनी दिला; मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विवेक पारसकर यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करताच आशा मिरगे आणि त्यांच्या मुलाने अटकपूर्व जामीन घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आशा मिरगे आणि त्यांच्या मुलगा अनिमेश मिरगे या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे मिरगे व त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.