कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
By नितिन गव्हाळे | Published: August 9, 2023 01:04 PM2023-08-09T13:04:54+5:302023-08-09T13:05:35+5:30
या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अकोला : शिवणीतील प्रकाश बाग येथून कार चोरून नेणाऱ्या तीन जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शिवणीत राहणारे शेख तौफिक शेख रफिक (२३) यांच्या तक्रारीनुसार त्यांची जुनी वापरती टाटा एस कार क्र. एमएच २० सीटी ०७१२ ही नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. २३ जुलैच्या रात्री दरम्यान फिर्यादीचे वडील घरी आल्यावर त्यांना घरासमोर कार उभी दिसली नाही. त्यांनी ही बाब मुलाला सांगितली. कारच्या आजूबाजूला शोध घेतला. परंतु गाडी मिळून आली नाही. चारचाकी टाटा एस. गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शेख तौफिक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान अब्दुल शोएब अब्दुल फारूख(१९), नदीम बेग उर्फ राव गिट्टी कलीम बेग(२७) रा. अंबिका नगर, वाशिम बायपास आणि मो. समीर मो. शरिफ(२४) रा. मासुम दर्गा, मोमीनपुरा, नागपूर यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, आरोपींनी शेख तौफिक यांची कार चोरून ती नागपूरला विकल्याचे सांगितले.
पातूर, जुने शहरातूनही चोरल्या कार
आरोपींची एमआयडीसी पोलिसांनी चौकशी केल्यावर, तीनही आरोपींनी अकोल्यातील पातूर, जुने शहर येथून वेगवेगळ्या कंपनीच्या कार चोरून नागपुरात विक्री केल्याचे सांगितले. यासोबतच त्यांच्या टोळीत आणखी काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ही कारवाई सपोनि किशोर वानखेडे, डीबी पथकातील एएसआय दयाराम राठोड, विजय अंभोरे, सतीश प्रधान, सतीश इंदोरे यांनी केली.