नांदेड येथील चोरीची गाडी अकोल्यात पकडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:33 PM2018-12-31T13:33:37+5:302018-12-31T13:34:14+5:30
तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली.
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांना हरिहरपेठ परिसरात एक चारचाकी वाहन बेवारस आढळून आले. तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली. यासंदर्भात जुने शहर पोलिसांनी नांदेड पोलिसांना माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, नांदेड येथील नागगाव तालुक्यातील कुंटूर जिनिंग मिलचे व्यावसायिक नीतेश जैन यांच्याकडे मध्य प्रदेशातील शेंदवा जिल्ह्यातील राजू यादव नामक व्यक्ती वाहन चालक म्हणून कामाला आहे. त्यांचा अर्थिक व्यवहार सतीश ऊर्फ दीपक पालीवाल सांभाळत होता. दरम्यान, जैन यांच्या सांगण्यानुसार दीपक पालीवाल व यादव यांनी २१ डिसेंबर रोजी वजीराबाद परिसरातील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतून ३० लाख रुपये काढले. त्यानंतर घरी परत येत असताना एका वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडविली. कागदपत्रे दाखविण्याचे कारण समोर करून त्यांना उतरण्यास सांगितले. तुमची गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जावी लागणार, असे सांगून पोलीस गाडीत बसला. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि गाडी चालक दोघेही पैसे व गाडी घेऊन फरार झाले. या प्रकरणात नांदेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गाडी थांबविणारा वाहतूक शाखेचा कर्मचारी होता की नाही, याबद्दल नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस चौकशी केली. वाहन चालक राजू यादव आणि सतीश ऊर्फ दीपक पालीवाल यांनीच बानावट कट रचून पैसे व एमएच १९ बीजे ९९७५ क्रमांकाची कार पळवून नेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर राजू यादव याला अटक करण्यात आली, तर सतीश हा फरार आहे. याप्रकरणी नांदेड पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना सतर्क केले. दरम्यान, अकोल्यासह इतर जिल्ह्यांत नाकाबंदी लावण्यात आली. २८ डिसेंबर रोजी जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना हरिहरपेठ भागात एक कार बेवारस आढळली. तपासानंतर ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यावसायिकाची असल्याचे समोर आले. यासंदर्भात अकोला पोलिसांनी नांदेड पोलिसांना माहिती दिली असून, चोरी झालेली कार नांदेड पोलिसांच्या ताब्यात दिली.