राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकची अमोरासमोर धडक; चार जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 04:10 PM2020-07-20T16:10:55+5:302020-07-20T18:15:22+5:30
दोन चिमुकल्यांसह चार जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुर्तीजापूरजवळ घडली.
मूर्तिजापूर : भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जबर धडक दिली. यात कारमधील एकाच कुटूंबातील चौघे जण जागीच ठार झाले. यात दोन चिमुकल्या मुलांचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नागोली-नागठणाजवळ घडली. अपघातात तिघे जण गंभीर झाले असून, त्यांना उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले आहे.
नागपूर येथून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या एमएच 0४-बीडब्ल्यू-५२५९ क्रमांकाच्या कारला समोरून भरधाव येणाºया एमएच १५एफव्ही १४१३ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारच्या समोरील भागाचा पूर्णत: चुराडा झाला. कारमधील बुराऊद्दीन दिलावर(३५), फातेमा दिलावर(५0 दोन्ही रा. नाशिक) यांच्यासह असलिम(४) आणि बुरहानुद्दीन(६ महिने) हे चौघे जण जागीच ठार झाले तर साबिया हुसैन हबीब हुसैन(३0), हुसैन हबीब मोहम्मद हुसैन(३५) आणि हुसैन गुलाम हुसैन(५0 तिघे रा. मुंबई) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रूग्णालयात भरती केले आहे. कार आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. ट्रकची धडक बसताच, मृतक कारच्या बाहेर फेकल्या गेले. अपघाताची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या रुग्णवाहिकेतून जखमी व मृतकांना रुग्णालयात आणण्यात आले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चिमुकले ठार; आई-वडील जखमी
कारमधील असलिम व बुरहानउद्दीन हे दोघे चिमुकली मुले जागीच ठार झाली, तर त्यांचे आई-वडील साबिया हुसैन आणि हबीब हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोल्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.