कार चालवणे आले अंगलट; गोरक्षण रोडवर अपघात
By admin | Published: May 17, 2017 02:43 AM2017-05-17T02:43:33+5:302017-05-17T02:43:33+5:30
अकोला: जुन्या आरटीओ कार्यालयासमोर गॅरेजवर उभी असलेली कार नजरा चुकवून मुलांनी सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुन्या आरटीओ कार्यालयासमोर गॅरेजवर उभी असलेली कार नजरा चुकवून मुलांनी सुरू केली. ही कार त्यांनी दामटत गोरक्षण रोडवर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पूजा कॉम्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये जाऊन पडली. यात तीन मुले किरकोळ जखमी झाले. जर कार डीपीवर जाऊन आदळली असती तर मोठा जीवघेणा प्रसंग उद्भवला असता. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली.
अनेक दिवसांपासून तीन अल्पवयीन मुलांना एक कार गॅरेजवर उभी दिसत होती. ही कार आपण चालवूनच पाहू, असा मोह त्यांना झाला असावा. त्यानुसार गॅरेजमध्ये कुणीही नसल्याचे पाहून मुले कारमध्ये बसले व कार सुरू केली. कार सुरूही झाली. त्यानंतर त्यांनी गोरक्षण रोडकडे कार चालवत आणली; मात्र वाहन चालवण्यासाठी मुलांचा हात साफ नसल्याने पूजा कॉम्प्लेक्ससमोर वाहन चालवणाऱ्या मुलाकडून कारचा वेग अचानक वाढला
अन् याला काही समजण्याच्या आतच कार डीपीच्या १० फूट मागे पूजा कॉम्प्लेक्सच्या खाली जाऊन आदळली; मात्र मुलांना फारसे काही लागले नाही. एक जण किरकोळ जखमी झाला. लगेच गॅरेज मालकाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचला. आपण या तिन्ही मुलांना कधी पाहिले नाही किंवा त्यांना ओळखण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले. शेवटी गॅरेजमालकाने खदान पोलिसात धाव घेऊन अपघाताची माहिती दिली. मुले ही कार घेऊन काय करणार होती किंवा कार कुठे नेणार होते, याबाबत तपास करीत आहेत.
नशीब बलवत्तर म्हणून...
अपघात एवढा भीषण होता की कार कॉम्प्लेक्सच्या खाली आदळल्याने कॉम्प्लेसच्या पायऱ्या तुटल्या व कारच्या समोरच्या काचा फुटल्या; मात्र तिघेही कारमध्येच अडकल्याने त्यांना फारसे लागले नाही; मात्र हीच कार जर समोर असलेल्या डीपीला धडकली असती मोठा बर्निंग थरार झाला असता. या ठिकाणी उपस्थित मुलांचे नशीब बलवत्तर अशी चर्चा करीत होते.