राज्यातील आठ शासकीय रुग्णालयात होणार अत्याधुनिक कार्डियाक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:56 PM2019-07-26T13:56:36+5:302019-07-26T13:56:54+5:30
अकोला: राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आठ शासकीय रुग्णालयातील कार्डियाक केअर सेंटरचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.
अकोला: राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आठ शासकीय रुग्णालयातील कार्डियाक केअर सेंटरचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २४२ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर आठ शासकीय रुग्णालयांमध्ये अकोला मंडळातील अमरावती येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.
हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी या अनुषंगाने राज्यातील सरकारी रुग्णालयात असलेल्या कार्डियाक केअर युनिटचे अत्याधुनिकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली. यासाठी शासनाने २४२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कार्डियाक केअर सेंटरच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ही उपकरणे विनावापर पडून राहणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच रुग्णांना योग्य वेळी आवश्यक उपचार मिळणार आहे.
या रुग्णालयांचा समावेश
यामध्ये प्रामुख्याने अमरावती, वर्धा, रत्नागिरी, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, नांदेडसह पुण्यातील सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे.
या अत्याधुनिक उपकरणांचा असणार समावेश
या केंद्रामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ईसीजी मशीन, स्ट्रेस ईसीजी टेस्ट इक्विपमेंट, कार्डियाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, पल्स आॅक्सिमीटर, इन्फ्युजन पाइप्स या उपकरणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्डियाक केअर सेंटरच्या अत्याधुनिकरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये अकोला आरोग्य मंडळातील अमरावती येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.
- डॉ. फारूकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ