ही बेफिकिरी चिमुकल्यांसाठी घातक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:30+5:302021-06-04T04:15:30+5:30
पालक जबाबदारी स्वीकारणार का? ज्येष्ठांप्रमाणेच कुटुंबातील चिमुकल्यांची जबाबदारी ही पालकांची आहे. चिमुकल्यांचे इतर हट्ट पुरविताना त्यांच्या आरोग्याची काळजी राखणेही ...
पालक जबाबदारी स्वीकारणार का?
ज्येष्ठांप्रमाणेच कुटुंबातील चिमुकल्यांची जबाबदारी ही पालकांची आहे. चिमुकल्यांचे इतर हट्ट पुरविताना त्यांच्या आरोग्याची काळजी राखणेही आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेक बालक बेफिकिरीने लहान मुलांना विनामास्क बाजारात घेऊन जाताना दिसून येतात. स्वत:ही पूर्ण मास्क लावत नाहीत. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी पालक स्वीकारणार का, की आणखी बेफिकीर राहून हीच स्थिती कायम ठेवतील हे येणारा काळच सांगेल.
दुसरी लाट ओसरली. मात्र, चुकांची पुनरावृत्ती कायमच
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण लॉकडाऊन, तरीही लोक विनामास्क घराबाहेर पडायचे.
बाजारातील गर्दी टाळली. मात्र, गल्ली बोळीत गर्दी कायमच.
मास्क नाही, फिजिकल डिस्टन्सिंग नाही.
लग्न समारंभातही कोरोनाचा विसर.
बाहेरून घरात परतल्यावर हात पाय न धुताच ज्येष्ठांसह चिमुकल्यांच्या संपर्कात येणे.
दुसऱ्या लाटेतही याच चुका केल्या. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरला.
हे करणे आवश्यक
मास्क घालूनच घराबाहेर पडावे.
गरज नसताना घरातच थांबावे.
बाहेर पडताना एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.
लहान मुलांना बाजारात नेणे टाळावे.
नियमित हात धुणे, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर राखावे.
मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले. मात्र, नागरिकांनी पुन्हा त्याच चुका करू नयेत. कोरोना नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर, नियमित हात स्वच्छ धुणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर राखण्यासह बालकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांसह पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला