जंतनाशक गाेळीवाटपाला काेराेनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:17+5:302021-03-08T04:18:17+5:30
अकाेला : आतड्याचा कृमीदोष टाळण्यासाठी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात ...
अकाेला : आतड्याचा कृमीदोष टाळण्यासाठी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता कर्मचाऱ्यांना घराेघरी पाठविणे धाेक्याचे ठरू शकते, त्यामुळे जंतनाशक गाेळ्यांचे वितरण एप्रिल महिन्यात करण्याचे नियाेजन आराेग्य विभागाने केले आहे.
१ ते १९ वर्षे वयोगटांतील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळी दिली जाते. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुलामुलींना अंगणवाडीसेविका व आशासेविका यांच्याद्वारे जवळपास ८५ टक्के जणांना जंतनाशक गोळी घरपोच देण्यात आली. कोरोनामुळे गोळीवाटप करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
घरोघरी जाताना घ्यावी लागेल काळजी
अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळीवाटप करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. सध्या काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना जंतनाशक गाेळ्यांचे वाटप न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
जिल्ह्यात १ मार्च रोजी १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. सध्या काेराेनामुळे हे वितरण थांबवले असून एप्रिलमध्ये वितरण करण्यात येईल
- डॉ. सुरेश आसाेले, जिल्हा आरोग्य अधिकारी
एकूण लाभार्थी ८६,७९६