कार्निवल सिनेमा आजपासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 01:34 AM2017-06-08T01:34:26+5:302017-06-08T01:34:26+5:30

बिल्डिंग खाली करण्यास बजावले

Carnival Cinema is closed today! | कार्निवल सिनेमा आजपासून बंद!

कार्निवल सिनेमा आजपासून बंद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत दहा वर्षांपासून अकोलेकरांच्या मनोरंजनाचे केंद्र म्हणून ओळख प्राप्त केलेल्या कार्निवल सिनेमाचे चारही स्क्रीन गुरुवारपासून बंद होणार आहेत. बिल्डिंगची मालकी असलेल्या चार भागीदारांनी ही बिल्डिंग कार्निवल सिनेमा प्रशासनाला खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे कार्निवल सिनेमाने गुरुवारपासून सिनेमाचे सर्व खेळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर राधाकृष्ण चित्रपटगृह अकोलेकरांना परिचित होती. चित्रपटगृहाचे मालक योगेश पाटील यांनी हे चित्रपटगृह शहरातील तोष्णीवाल, गोयनका, बाजोरिया या भागीदारांना कोट्यवधी रुपयांमध्ये विकले. नंतर या भागीदारांनी हे चित्रपटगृह मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या बिग सिनेमाला भाडेततत्त्वावर दिले. बिग सिनेमाने हे चित्रपटगृह पाच वर्षे यशस्वीरीत्या चालविले.
त्यानंतरही हे चित्रपटगृह चित्रपटसृष्टीतील श्रीकांत भोसा यांच्या कार्निवल सिनेमा कंपनीने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली. त्यासाठी ही कंपनी भागीदारांना महिन्याकाठी सहा लाख रुपये भाडे मोजायची. कार्निवल सिनेमामध्ये चार वातानुकूलन स्क्रीन आहेत. हे चित्रपटगृह बंद होत असल्याने रसिकांना चांगल्या मनोरंजन केंद्राला मुकावे लागणार आहे.

कार्निवल कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
कार्निवल सिनेमा असलेली बिल्डिंग खाली करण्यास सांगितल्यामुळे गुरुवारपासून कार्निवल सिनेमा प्रशासनाने चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्निवल सिनेमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आपली नोकरी जाणार असल्याने अनेकांना दु:ख झाले असून, आता पुढे काय करावे, असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे. आठ, दहा हजार रुपये या कंपनीमध्ये काम मिळायचे आणि त्यावर घर चालायचे. आता घर कसे चालणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, अशा अनेक प्रश्नांनी कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत.

बिल्डिंगची मालकी असलेल्या चार भागीदारांनी ही बिल्डिंग खाली करण्यास सांगितल्यामुळे आम्हाला गुरुवारपासून कार्निवल सिनेमा बंद करावा लागणार आहे. ही बिल्डिंग आम्ही खाली करून देणार आहोत.
- राजेंद्र पवार, व्यवस्थापक

Web Title: Carnival Cinema is closed today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.