कापूस व्यापा-याची गाडी पळवली
By admin | Published: January 12, 2016 01:42 AM2016-01-12T01:42:36+5:302016-01-12T01:42:36+5:30
पैसे नसल्याने प्रयत्न फसला; चार आरोपींवर गुन्हा.
देऊळगावराजा : कापूस व्यापार्यांचे कर्मचारी इंडिका गाडीतून २0 लाख रुपये बँकेतून घेऊन जात असल्याची पक्की खबर मिळाल्याने चार चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत गाडीच पळवली; मात्र बँकेतून पैसेच न मिळाल्याने चोरांचा प्रयत्न फसल्याचा प्रकार देऊळगावराजा येथे सोमवारी घडला. सिंदखेडराजा रोडवरील नवीन कॉटन जिनिंगचे कर्मचारी शेतकर्यांचे कापसाचे पैसे चुकते करण्यासाठी दे.राजा एसबीआय बँकेच्या शाखेतून २0 लाख रुपये काढण्यासाठी आले होते; मात्र बँकेमध्ये कनेक्टीव्हीटी सुविधा बंद पडल्याने त्यांना रक्कम मिळाली नाही. इंडिका गाडीतून दोन कर्मचारी परत नवीन कॉटन जिनिंगकडे परत निघाले. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दोघे जण मोटरसायकलने निघाले. गुगळादेवी मंदीराकडे जाणार्या रस्त्यासमोर चोरट्यांनी इंडिका गाडी अडवून दोन कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवून गाडीत घुसले. दरम्यान कॉटन जीनिंगच्या व्यवस्थापकाचा फोन केला; मात्र फोन उचलला जात नसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसांना प्रकार सांगीतल्यानंतर एसडीपीओ प्रशांत परदेशी ठाणेदार कैलास ओहळ यांनी विभागातील सर्व पो.स्टे.ला संदेश देत नाकाबंदी केली. सुलतानपूर जवळ इंडिका गाडी गरम होवून बंद पडली. वीस लाख रुपये सुध्दा मिळाले नाही. गाडीही बंद पडल्याने इंडिकातील दोघे बोलेरो गाडीतील दोघे असे चार चोरटे गाड्या सोडून सुलतानपूर नजिक जंगलाच्या दिशेने पळाले. मात्र पोलिसांनी गजानन मच्छिंद्रनाथ पवार (२५) रा.जालना आणि गंगानगर नेवासा येथील निलेश एकनाथ शेंडगे (२३), संदीप कचरु भालेराव (२२), अविनाश अरुण खंडागळे (२१) यांना ताब्यात घेतले. पोलिस अधिक्षक संजय बावीस्कर अप्पर पो.अ.श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पत्रकार परिषदेत घटनेची माहिती दिली. संतोष भटू पाटील, प्रशांत तायल यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चारही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.