सत्ताधारी भाजपला गाजर; कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा साेक्षमाेक्ष नाहीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:46+5:302021-07-15T04:14:46+5:30
शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावर बाेट ठेवत मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी पडीक वार्ड बंद केले. तसेच या वार्डात आस्थापनेवरील सफाई ...
शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावर बाेट ठेवत मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी पडीक वार्ड बंद केले. तसेच या वार्डात आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ही संख्या अपुरी असल्याने आयुक्तांच्या प्रयाेगामुळे साफसफाईच्या कामाची घडी विस्कटल्याचा आक्षेप घेत या मुद्यावर १४ जून राेजी मुख्य सभागृहात
विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव विजय अग्रवाल यांनी मांडला हाेता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी अनुमाेदन दिले हाेते. यावेळी आयुक्तांच्या भूमिकेवर अग्रवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आमच्यासाेबत संघर्षाची भूमिका घेऊ नका अन् आम्हाला घेऊ देऊ नका, असे स्पष्ट केले हाेते.
मुदत संपली तरीही...
सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ती वाढवून देण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केल्यानंतर आयुक्त अराेरा यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी ३० दिवसांची मुदत मागितली हाेती. ही मुदत १४ जुलै राेजी संपुष्टात आली असली तरी अद्यापही कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रशासनाने काेणताही निर्णय घेतला नाही,हे विशेष.
सत्तापक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
मनपा आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी, या उद्देशातून सत्तापक्षाने १४ जून राेजी विशेष सभेचे आयाेजन केले हाेते. सभागृहात आयुक्त जुमानत नसल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष अनेक इशारे व टाेले लगावले हाेते. तरीही आयुक्तांनी निर्णय घेतला नसल्याची बाब समाेर आल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी काेणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.