शेतरस्त्याचे काम मंजूर नकाशानुसार करा; रेडवा येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु
By संतोष येलकर | Published: January 11, 2024 07:41 PM2024-01-11T19:41:14+5:302024-01-11T19:41:31+5:30
रेडवा शिवारात शेतकरी देवानंद सावळे व प्रकाश सावळे यांच्या शेतजमीनीतून संबंधित शेतरस्त्याचे काम करण्यासंदर्भात सुचिवले जात आहे.
अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील रेडवा येथील शेतरस्त्याचे काम शेतातून न करता, भूमी अभिलेख विभागाच्या मंजूर नकाशानुसार करण्यात यावे, या मागणीसाठी रेडवा येथील दोन शेतकऱ्यांनी गुरुवार ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बार्शिटाकळी ते रेडवा शेतरस्त्याचे काम सुरु आहे.
त्यामध्ये रेडवा शिवारात शेतकरी देवानंद सावळे व प्रकाश सावळे यांच्या शेतजमीनीतून संबंधित शेतरस्त्याचे काम करण्यासंदर्भात सुचिवले जात आहे. त्यामुळे शेतातून शेतरस्त्याचे काम न करता भूमी अभिलेख विभागाच्या मंजूर नकाशानुसार बार्शिटाकळी ते रेडवा या शेतरस्त्याचे काम करण्याचा संबंधितांना आदेश देण्यात यावा, अशी मागणी करीत, रेडवा येथील शेतकरी देवानंद सावळे व प्रकाश सावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मागणी मान्य होइपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचेही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले.