लाचखोर कृषी सहायकासह पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:07 PM2020-03-13T12:07:00+5:302020-03-13T12:07:07+5:30
ललिता इंगोले- तायडे आणि त्यांचा पती धम्मपाल तायडे या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला : गोरेगाव येथील एका शेतकऱ्याच्या लिंबाच्या रोपांचे ११ हजार ५०० रुपयांचे मस्टर वरिष्ठांना सादर केल्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया गोरेगाव येथील कृषी सहायक ललिता इंगोले- तायडे आणि त्यांचा पती धम्मपाल तायडे या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथील ३३ वर्षीय शेतकºयाने लिंबू रोपे शेतात लावली असून, या रोपांचे मस्टर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केल्याच्या मोबदल्यात कृषी सहायक ललिता इंगोले -तायडे यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच मागणी करण्यासाठी धम्मपाल तायडे यानेही तिला प्रवृत्त केले; मात्र तक्रारकर्त्या शेतकºयास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून अकोला एसीबीने २१ नोव्हेंबर २०१९ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता या दोघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लाचेची रक्कम देवाण-घेवाण करण्याचे ठरले असता लाचखोर कृषी सहायक इंगोले व तिच्या पतीला संशय आल्याने त्यांनी लाच घेण्याचे टाळले; मात्र पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे समोर आल्याने एसीबीने तपास करून या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही लाचखोर आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी पडताळणी
पडताळणी नोव्हेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती; मात्र लाच घेण्याचे टाळल्याने अकोला एसीबीला या प्रकरणाचा तपास करावा लागला. त्यानंतर सदर प्रकरणात दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.