उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल!
By राजेश शेगोकार | Published: March 4, 2023 06:24 PM2023-03-04T18:24:17+5:302023-03-04T18:24:58+5:30
वेगवेगळ्या उत्सवाच्या नांवावर करायचा खंडणीची मागणी!
राजेश शेगोकार, अकोला :-बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पारस ग्राम पंचायत च्या उपसरपंच पती मो.जाफर मो. रफिक याच्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात खंडणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की, बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे पारस येथील पोळा चौकात अकोला येथील उद्योजक निखिल आलिमचंदानी यांचे शासन मान्य किरकोळ विक्री देशी दारूचे दुकान आहे.
या दुकानात दीपक कलाचंद मोटवाणी हे नोकरी करतात.दिनांक3 मार्च २०२३ च्या अंदाजे दुपारी१२ वाजता दरम्यान ५०हजार रुपयांची खंडनी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरुन पारस उपसरपंच पती मो. जाफर मो.रफिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, मो. जाफर मो. रफिक याची पत्नी पारस गावाच्या उपसरपंच पदावर कार्यरत असुन, नमूद आरोपीची पत्नी उपसरपंच पदावर विराजमान झाल्या पासून,मो.जाफर हा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या नावावर पैशाची मागणी देशी दारू दुकान मालक यांच्याकडे करीत होता.सुरवातीच्या काळात त्याची मागणी पूर्णही केली जात होती,परंतु दिवसेंदिवस नमूद आरोपी ची पैशाची मागणी वाढतच गेली,३ मार्च२०२३ च्या अंदाजे १२ वाजता दरम्यान मो.जाफरने दुकानात नोकर असलेल्या दीपकला फोन करून,येत्या २३ तारखेला पारस गावात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी तुझ्या मालकाला सांगून ५० हजार रुपये देण्याची मागणी केली.
जर रक्कम दिली नाही तर, तुम्हाला पारस गावात दुकान चालु देणार नाही अश्या प्रकारे वक्तव्य करून,जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार दाखल केल्यावरून मो. जाफर याच्यावर भारतीय दंड संहिताचे कलम ३८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"