कॅशलेस व्यवहार लोकाभिमुख करावा!

By Admin | Published: April 15, 2017 01:28 AM2017-04-15T01:28:04+5:302017-04-15T01:28:04+5:30

अकोला- कॅशलेस व्यवहार अधिकाधिक लोकाभिमुख करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज डिजिधन मेळाव्याच्या समारोप प्रसंगी केले.

Cashless deals should be directed towards people! | कॅशलेस व्यवहार लोकाभिमुख करावा!

कॅशलेस व्यवहार लोकाभिमुख करावा!

googlenewsNext

पालकमंत्र्यांचे आवाहन: डिजिधन मेळाव्याचा समारोप

अकोला: बदलत्या काळानुसार जगासोबत चालण्यासाठी कॅशलेस व्यवहार ही काळाची गरज बनली आहे. दैनंदिन व्यवहारात गैरव्यवहार टाळण्याबरोबरच पारदर्शकता आणण्याकरिता कॅशलेस व्यवहार अधिकाधिक लोकाभिमुख करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज डिजिधन मेळाव्याच्या समारोप प्रसंगी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर आदीसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, कॅशलेस इकॉनॉमी हे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य सरकारही प्रयत्न करीत आहे. आज प्रत्येकाकडे मोबाइल आहे. या मोबाइलच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करणे सहज शक्य झाले आहे. रोखीचा व्यवहार कमी करणे या उद्देशासोबतच व्यवहारात फसवणूक टाळून आपली पत वाढविण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेस व्यवहाराकडे वळावे, याकरिता भीमसारख्या अ‍ॅपचा उपयोग करावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेली उद्दिष्ट्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या प्रयत्नांमुळे मागील दोन वर्षात पूर्ण झालेले आहे, या शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करून कॅशलेस व्यवहारही प्रशासनाने लोकभिमुख करावा, असेही त्यांनी सांगितले. कॅशलेस व्यवहारासाठी परिश्रम घेणाऱ्या बँकेच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय पीओएस मशीनद्वारे स्वस्त धान्याचा व्यवहार करणारे स्वस्त धान्य दुकानदार गांधी यांचे कौतुक करून पालकमंत्री यांनी पीओएस मशीनद्वारे कसा व्यवहार केला जातो, याचे प्रात्यक्षिक बघितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

‘कॅशलेस’साठी जनजागृतीवर भर - जिल्हाधिकारी
अकोला जिल्हा कॅशलेस करण्यासाठी प्रशासनासोबतच बँकेचे अधिकारी परिश्रम घेत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहार करावा, यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. महा-ई-सेवा केंद्रांमार्फत पीओएस मशीन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या मशीन वापरण्यामध्ये आपला जिल्हा अग्रणी ठरला आहे. पतसंस्था, बँका, पेट्रोल पंपचालक यांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या.
कॅशलेस व्यवहारासाठी अ‍ॅटोचालकांची कार्यशाळा घेण्यात आली. रेशन दुकानदारांना पीओएस मशीनच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. शेतकरी व सर्वसामान्यांनी भीम प्रणाली व ई-व्हॅलेटच्या माध्यमातून व्यवहार करण्याकरिता जनजागृतीवर भर देण्यात येत आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

 

Web Title: Cashless deals should be directed towards people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.